हिरा… या कथेच्या निमीत्ताने थोडसं हितगुज…
ही कथा लिहिण्यामागचं प्रयोजन असं की, माझ्या आठवणीतील ह्या पात्राचं, मी प्रकाशित केलेल्या 'अशा तुडविल्या काटेरी वाटा' या पुस्तकात उल्लेख करू शकलो नाही. कारण माझे बालपण ते नोकरी लागेपर्यंतचा जो माझ्या जीवनातील कडू-गोड प्रवास होता, तेवढ्या पुरतेच मला शब्दबद्ध करायचा होता. या मर्यादेत हिराचं पात्र बसत नव्हतं.
हिराच्या अकाली मृत्यूची घटना म्हणजे रात्रीच्या चांदणी प्रकाशात आकाशातून आपल्या नजरेसमोर एखादा तारा निखळून सरकन खाली पडावा, असंच काहीसं होतं.
म्हणून मी विचार करीत होतो की, या पात्राची ओळख कशी करून द्यावी? याच उद्देशाने मी ही कथा रेखाटली आहे.
या कथेतील काही प्रसंग माझ्या नोकरीच्या आधीचे आहेत, ज्याचे रेखाटन मी 'अशा तुडविल्या काटेरी वाटा' या पुस्तकात आलेले आहे. ज्यांनी हे पुस्तक वाचलं असेल त्यांना कंटाळा येऊ नये; म्हणून मी त्या आठवणी विस्ताराने न सांगता अगदी त्रोटकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
आर.के.जुमळे
………………………………………
हिरा…
मसनखुटीत भडकलेल्या चितेच्या ज्वालात मला हिराचा अस्पष्ट असा चेहरा दिसत असल्याचा भास होत होता.
हिरा म्हणजे माझ्या मामाची मुलगी…
माझा मामा दमडू… माझ्या आईचा हा भाऊ आणि मोठी बहिण धुरपताबाई… हे तिघेही बहिणभाऊ चौधरा गावातच राहत होते. मामाचं घर माझ्या घरापासून एका हाकेच्या अंतरावर म्हणजे एक घर सोडून होतं, तर मोठ्या आईचं घर मात्र दुर होतं.
आमचे कौटुंबिक संबंध तसे जिव्हाळ्याचे होते. एकमेकांच्या घरी येणा-या पै-पाहुण्यांना आमच्या तिन्हीही घरी पाहूणचार झाल्याशिवाय पाठवित नसत.
मामा म्हणजे गावातला मानवाईक व्यक्ती.... तो लोकांना अडीअडचणीला उसणे पैसे द्यायचा. म्हणून गावकरू त्यांना सावकार म्हणत. अशा प्रतिष्ठित घरात 'हिरा'ने जन्म घेतला होता.
मामा शांत व अबोल स्वभावाचा. निर्व्यसनी. चिलम ओढण्याशिवाय त्याला दुसरं कोणतंही व्यसन नव्हतं. तसं चिलमीचं व्यसन खेड्यात सार्वत्रिक होतं, म्हणा.... या व्यसनाचं कुणाला काही वाटत नव्हतं.
मामा फारसा शिकलेला नव्हता. गावातील बरेचसे लोक मुळातच लिहता-वाचता येईल इतपत शिकलेले होते.
आमच्या चौधरा गावात शाळा नव्हती. गावाजवळील निळोणा येथे शाळा होती, तिही चौथीपर्यंतच ! या कारणाने बहुतेकांचं त्यापुढील शिक्षण खुंटून जात होतं.
डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमूळे गावातील काही जागृत लोकांनी आपापल्या मुलांना जास्तीत जास्त शिक्षण देण्याचा ध्यास धरला होता. मामा पण त्यापैकी एक होता. त्यांनी त्यांच्या मुलींना म्हणजे चित्राबाई व सुदमताबाईला यवतमाळला शिकायला ठेवले होते. माझे बाबांनी मला व माझी बहीण जनाबाई असे आम्हा दोघा बहिण-भावाला यवतमाळच्या शाळेत टाकले होते. राहायला आम्ही यवतमाळ जवळील उमरसरा या गावाला होतो.
नंतर मामानेही त्यांच्या मुलींना उमरसरा या गावाला आणून ठेवले होते. त्यावेळी हिरापण त्यांच्यासोबत होती.
मी शिक्षणात असल्याचा मामाला मोठा अभिमान वाटत होता. मी यवतमाळला तहसील ऑफीसच्या समोर शामरावदादाची वाट पाहतांना दिसलो की, तो समजून जायचा की मला काहीतरी अडचण असावी. मग दादा नाही आला की, तोच मला एकाद्यावेळी पैशाची मदत करायचा. एकदा मला कंपासपेटी घेण्यासाठी पाच रुपये दिले होते. मी सुट्टीत घरी गेलो की, माझी हमखास आपुलकीने विचारपूस करायचा.
हिरा तिच्या लग्नानंतर पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी, मामाकडे आली होती.
तिला गरोदरपणात आजार झाला होता. हात-पाय सुजले होते. त्यातच तिचं अकाली निधन झालं. ही घटना इतकी धक्कादायक होती की, माझ्या मनात ती खोलवर जखम करून गेली होती.
मी तोपर्यंत कधीही कुणाच्या मयतीला स्मशानभूमीत गेलो नव्हतो. कारण तसा काही प्रसंग उद्भवला नव्हता. पण हिराच्या शवयात्रेत मात्र योगायोगाने सामील झालो होतो. आमच्या गावातील प्रेतं दशरथमामाच्या शेताच्या त्या चिरोटी शेतात ज्याला आम्ही डुंगं म्हणत होतो, तेथे नाल्याच्या काठावर खड्डा खोदून गाडीत असत. खड्डा बुजवल्यावर त्यावर मोठे दगडं टाकून ठेवत. एखाद्यावेळी तिकडे जायची पाळी आलीच तर चोरट्या नजरेने मी या फुगलेल्या ढिगाकडे पाहत होतो. लहानपणी ऐकलेल्या भुता-खेतांच्या गोष्टींमूळे माझ्या मनात भीतीने जबरदस्त घर केले होते. म्हणून समजायला लागेपर्यंत असे दृश्य पाहण्याची मला फार भीती वाटत होती.
आमच्या गावावरून पांढरी गावाला जातांना बाभळीच्या झाडाखाली माझी आजी नगिनाबाई म्हणजे आईची आई, जी मामाकडे राहत होती, तिला मुठमाती दिल्याची जागा एकदा दादाने मला दाखविली होती. त्या जागेकडं लक्ष गेलं की मनात धस्स् व्हायचं.
सहसा गावातील प्रेतांना जमिनीत गाडण्याची प्रथा होती. पण ह्यावेळी मात्र हिराच्या प्रेताला जाळण्यात आले होते.
हिराचं लग्न झालं, त्यावेळी मी ब्रम्हपुरी या दुरच्या ठिकाणी नोकरीला होतो. कार्यालयीन कामाच्या व्यस्ततेमुळे मला सुट्टीचं न जमल्याने या लग्नाला हजर होता आलं नाही. मी तिच्या लग्नाला जरी जाऊ शकलो नाही, तरी तिच्या मरणाला मात्र हजर झालो होतो. ऐवढेच नव्हे तर तिच्या मरणापूर्वीच्या आजारपणात धावाधाव करण्यात माझाही मोठा वाटा होता.
हा योगायोग कसा जुळला काय माहित? पण कदाचित तिच्या अखेरच्या प्रवासात मी सोबत करावी, असे नियतीने बहुतेक ठरविले असावे. म्हणूनच हा योग जुळून आला होता की काय?
त्यादिवशी हिराची तब्ब्येत फारच बिघडली होती. तिचे हात-पाय सुजले होते. तिला श्वास घेणे कठीण झाले होते. छाती खाली-वर उडत होती. म्हणून मामा, मामी व सारेच कमालीचे घाबरून गेले होते. मी हिराला पाहण्यासाठी मामाच्या घरी गेलो, तेव्हा मला पाहून मामा म्हणाला, 'रामराव, तू यवतमाळला जाऊन कोथळे डाॅक्टरला घेऊन ये.'
मी 'हो' म्हणून लगेच यवतमाळला जायची तयारी केली.
कोथळे डाॅक्टरांचा दवाखाना जरी लोखंडी पुलाकडे दुर होता; तरी त्यांचा बंगला आमच्या गावाच्या रस्त्यावर असल्याने आमच्या गावातील लोक त्यांच्या घरीच ते असेपर्यंत औषधोपचार घेण्यासाठी जात असत. मी त्यांना आणण्यासाठी बरबडा गावाच्या मार्गाने धावतपळत, उठत-बसत तीन कोस वाटा तुडवत त्यांच्या घरी गेलो.
निळोणा धरण बांधल्याने पुर्वीचा जवळचा रस्ता राहीला नव्हता. म्हणून बरबडा याच गावाला वळसा देऊन यवतमाळला जावे लागत होते. दुसरा मार्ग पांढरी गावाकडून होता. पण तो दुरचा होता.
उन्हाळ्याचे दिवसं होते. दुपारची वेळ होती. सुर्य आग ओकत होता. अंगाची लाहीलाही होत होती. शरिरातून घामाच्या धारा वाहत होत्या. घसा व ओठ राहून राहून सोकून येत होतं.
त्या रखरखत्या उन्हाच्या काहिलीने झाडांची पाने झडून गेली होती. पानझडीमूळे पायवाट ओकाबोका व उघडानागडा पडला होता.
मधातच सुटलेल्या वावटळीच्या गराडात पाय पुढे टाकणे जड जात होतं.
शेताची उन्हाळवाही सुरू होती. नांगरलेल्या शेतातून पाय उचलून चालणे अतिशय त्रासाचे झाले होते.
डाॅक्टर नुकतेच दवाखान्यातून येवून जेवणाच्या ताटावर बसले होते.
मी त्यांना परिस्थितीची जाणीव करून गावाला चालण्याचा आग्रह धरला. हिराची तळमळ माझ्या डोळ्यासमोर तरळली की, मी कासावीस होत होतो. तिची तब्ब्येत आणखी बिघडण्यापूर्वी डाॅक्टरला घेऊन गावाला पोहोचणे फारच गरजेचं होतं. म्हणून मी त्यांची मनधरणी करीत होतो. रस्ता कच्चा असल्याने त्यांची हिंमत होत नव्हती.
शेवटी 'हो नाही' करत त्यांनी त्यांची स्कुटर आवाराच्या बाहेर काढली. मी मागे बसलो.
खरं म्हणजे त्यांच्या मागे का होईना स्कुटरवर बसायची माझी ही पहिलीच वेळ होती. स्कुटर फटफट करत चौधरा गावाच्या दिशेने निघाली. यवतमाळ आणि गोधणी गावाच्या मधात त्यावेळी जंगली झाडा-झुडपाचा उताराचा घाट होता. या घाटात मोठमोठ्या दगडाच्या उटा लागत होत्या. त्याच्याशी टक्कर घेतच स्कुटरला मार्गक्रमण करावे लागत होते. ही वाट म्हणजे कुठे बैलगाडी तर कुठे पायरस्ता तर कुठे शेतातून जाणारी होती. दगडं, माती, ढेकळांचा ओबडधोबड व त्रासदायक असा हा कच्चा रस्ता होता. या रस्त्याने जातांना, पहिले गोधणी, मग वाघामायची टेकडी, मग बरबडा व नंतर आमचे गाव…
डाॅक्टर मोठ्या मुश्किलीने स्कुटर चालवत आणि तोल सांभाळत रस्ता कापत होते. बरबडा गावापर्यंत कसंतरी आलो. पण या गावानंतर नांगरलेल्या शेतातून जाणे म्हणजे एक दिव्यच होतं. त्या नांगरटीतून स्कुटरचे चाकं काही केल्या जागची हलत नव्हते. डाॅक्टर हँडल पकडून पुढे ओढत होते, अन् मी मागून ढकलत होतो. इंच इंच जागा पुढे सरकत होती. दोघांचीही कमालीची दमछाक झाली होती. या शेतातून बाहेर पडून बरडाजवळच्या गाडीरस्त्यावर जाईस्तोवर आम्हाला खुप वेळ लागला होता.
आम्ही मामाच्या घरी पोहचलो. डाॅक्टरला पाहून आधीच जमलेल्या गर्दीत आणखी भर पडली. आमच्या गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच गावात डाॅक्टर आले होते. त्यामुळे लोकांना भरतं आलं होतं. मी डाॅक्टरला घेऊन आलो; म्हणून त्याचं श्रेय मला मिळत होतं.
डाॅक्टरने हिराची तब्ब्येत तपासली. तिची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. डाॅक्टरने इंजेक्शन दिले आणि सांगितले की तिला यवतमाळला सरकारी दवाखान्यात ताबडतोब नेऊन भरती करा. असे म्हणून त्यांच्यासोबत एक माणूस देऊन ते पांढरीमार्गे निघून गेलेत.
त्याक्षणी हिराला दवाखान्यात नेण्याची तयारी सुरू केली. बैलगाडीत गाद्या टाकून त्यात तिला झोपवून यवतमाळच्या दिशेने गाडी निघाली. सोबत बरेच लोक पायीपायी निघाले होते. मी पण त्यात होतो.
तिला वाघामायच्या टेकडीपर्यंत नेले नसेल तर हिराने प्राण सोडून दिला. मामाने टाहो फोडला. सारेच गलबलून गेले. मला तिचं गाडीत पहुडलेला निर्जीव देह पाहून हुंदका आवरता आला नाही. ती वाचावी म्हणून एवढी धावपळ केली, पण सारं वाया गेलं. तिला घेऊन आम्ही माघारी फिरलो. गावात आल्यावर आम्हाला पाहून काहीतरी अघटित घडलं असावं म्हणून सारेचजण जमा झालेत. घरी पाय ठेवल्याबरोबर मामीने हंबरडा फोडला. तरणाताठी मुलगी आपल्या डोळ्यासमोरून निघून जावी हे दु:ख सहन होण्यापलिडचं होतं. रडारड सुरू झाल्याने सारा परिसर हादरून गेला. माझ्याही डोळ्यातून आसवे टपकायला लागले.
जवळपासचे नातलग जमा झाल्यावर हिराची शवयात्रा रात्री उशिरा निघाली. कंदिल व बॅटरीच्या उजेडात जमाव अंधाराला भेदून मसनखूटीच्या दिशेने चालला होता.
हिराची चिता रचतांना गलबलून येत होतं. त्या चितेवर तिला झोपवतांना दु:खाचा बांध फुटला. चितेला अग्नी दिल्यावर आगीचा भडका उडताच प्रखर उजेडाने आसमंत न्हाऊन निघाला. हिराचं शव कनाकनाने जळत होतं. शरीर नष्ट होत होतं.
अशाच प्रकारे माझा पण एक दिवस असाच शेवट होणार असा विचार मनाला चाटून गेला. ज्या शरिराला एवढ्या प्राणपणाने जपलं, ते शरीर असंच नष्ट होईल याची जाणीव चाटून गेली... जो जन्माला येतो, तो एक दिवस असाच मरणार...! कोणी लवकर मरतो तर कोणी उशीरा मरतो, फरक एवढाच… जीवन हे अनित्य आहे, या भगवान बुद्धांच्या सिद्धांताची प्रकर्षाने आठवण झाली. मला वाटते, कोण कसा वागला याचा लेखाजोखा मसनखुटीतच होत असावा. माणसाने जगात कसं वागावं याची खरी शिकवण मिळण्यासाठी मसनखूटीशिवाय दुसरी जागा नसावी.
बंध मुठ्ठी आया जग में ,
खाली हाथ जायेगा।
दो दिन की जिंदगी है ,
दो दिन का मेला।
या राजस्थानी भजनाच्या ओळी येथे आठवल्याशिवाय राहत नाही.
अर्धी रात्र टळून गेली होती. वातावरणात भयान शांतता पसरली होती. वारा आणि झाडं-झुडपं सारेच स्तब्ध होऊन श्रद्धांजली वाहत असल्याचे भासत होते.
एकटी हिराला सोडून सारेजण जड अंतकरणाने परत फिरले...
हिरा कायमची दृष्टीआड झाली...
तिच्या जाण्याने आता राहील्या होत्या फक्त आठवणी…
परतीच्या वाटेवर आठवणीचा पुर दाटून आला...
एकेका पाऊलागणीक त्या आठवणी उफाळून वर येत होत्या...
गावात इतरांच्या मानाने मामाकडे बरीच शेती होती. त्याचं एक शेत वाघाडी नदीजवळ व बाकी गावाजवळ होती. मामाने शेती कधीच केली नाही, तर मक्त्या-बटईने लावून घातली होती. वाघाडी शेती निळोण्याचा सोनबा कोलाम तर गावातील शेती बाबा वाहत होता. बाबा ही शेती खुप वर्षापासून वाहत असावा असे आईच्या सांगण्यावरून वाटते.
ती एकदा म्हणाली होती की, 'जेव्हा मला तुया बाबाले दिले, तेव्हा त्यायची परिस्थिती गरिबीची होती. तुये बाबा आणि मोठेबाबा- पांडू दोघेही अनाथ होते. त्यायचे आई-बाबा मरगडीत मरण पावले होते. या दोघांचा सांभाळ त्यायच्या मावशीने केला. म्हणून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मामाने त्याची शेती बाबाला वाहायला दिली. मी लहान होती; तेव्हा लुळ्यासारखी राहत होती. मायं नाव अलूका असतांना मला लुली म्हणत. ह्या पोरीला कोण मागल म्हणून मामा काळजीत पडला होता. म्हणून त्याने तुया बापाला शेत वाहायला देऊन मायं लग्न लावून दिलं.' अशी ती कहाणी मला समजली होती.
मामा आधीपासूनच श्रीमंत होता. तो सावकारी करायचा. शिवाय तबला आणि चाटी बनविण्याचा धंदा करून गुजराण करायचा.
गावात आमची आर्थिक परिस्थिती ब-यापैकी होती.
आमच्या दोन्हीही कुटुंबातील संबंध सुद्धा अगदी सलोख्याचे राहीले होते.
पण कुळकायदा आल्याने आमच्या संबंधात कटुता निर्माण झाली. म्हणतात ना… 'दुधाची आई... न कसायाच्या गाई…' अशी आमची केविलवाणी अवस्था झाली होती.
'कसेल त्याची जमीन' या तत्वावर कुळकायदा आला होता. हा कायदा तसा कुळांसाठी न्यायोचीत आणि फायद्याचा होता. गावातील अनेक कुळ आता शेतीचे मालक झाले होते. पण आम्ही कुळ असूनही हा कायदा आमच्यासाठी जाचक ठरला. या कायद्यामुळे मामा चलबिचल झाला. त्याला वाटले की, 'शेती आता कोंडूची होईल.' म्हणून त्याने शेती परत देण्यासाठी तकादा लावला.
खरं म्हणजे जवळच्या नातेसंबंधामुळे बाबाने मामाची शेती कुळ कायद्यान्वये आपल्या मालकीची करून घेणे कधी मनातही आणलं नसतं.
बाबाचे म्हणणे असे होते की, 'तुमच्या शेतीची मालकी तुमच्याचकडेच राहू द्या. पण मला तुमची शेती आतापर्यंत जशी वाहत आलो, तशी वाहू द्या. कारण माझ्याकडे उत्पनाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने माझी मुलं-बाळं उघड्यावर पडतील.'
आईला या वादात काही बोलता येत नव्हतं. कारण 'इकडे घरचा माणूस व तिकडे भाऊ...'
'इकडे आड, तिकडे विहीर' अशी तिची अवघड परिस्थिती झाली होती. तरीही मामी आणि आईच्या मधात भांडण जुंपत राहायचं. दोघ्या नंदा-भावजयीचं कडाक्याचं भांडण मामा मुकाट्याने पाहत राहायचा.
त्याला बहीण-भाच्यांबद्दल माया, कळवळा नसेल असे कसं म्हणता येईल? पण मामीसमोर त्याचं काही चालत नव्हतं.
शेवटी तणाव खुपच वाढत चालल्याने बाबाने शेती परत केली. त्याबदल्यात मामाने शेंबडीचं चार एकर शेत नाममात्र किंमतीत बाबाच्या नावाने करून दिली. कुळकायद्यात कुळांना उचीत मोबदला देऊन शेती सोडवून घ्यायची मुभा होती. याच पद्धतीने मामाने आमच्याकडून व सोनबा कोलामाकडून शेत्या सोडवून घेतल्या होत्या.
पण ही शेती भरकाड असल्याने फारशी पिकत नव्हती.
आमची परिस्थिती आता कमालीची डबघाईला आली होती. पुर्वीचं वैभव आता ओसरत चाललं होतं. आमच्या शिक्षणाची आबाळ होत होती.
मामाला शेती परत केल्याने बरेच दिवस आम्हाला काहीतरी हरवल्यासारखे वाटत होतं. पांदणीच्या रस्त्याने जाता-येतांना वाडीकडे लक्ष गेलं की, उरात उमाळा दाटून यायचा. ह्या शेताबद्दल कमालीचा जिव्हाळा निर्माण झाला होता. हे शल्य आमच्या घरात खुप दिवस बोचत राहीलं. आता या गोष्टीला काही काळ लोटला होता, म्हणा… पण जखमा मात्र अजूनही पुर्णपणे बुजल्या नव्हत्या.
मला विद्युत मंडळाच्या चंद्रपूर विभागात नोकरीचा आदेश आला होता. नोकरी तर लागली; पण जायला व तेथे राहायला घरी कोणाकडेही तेवढे पैसे नव्हते. कोणाकडून मिळेल का याची चाचपणी करून पाहीली. पण कुणीही आधार दिला नाही. पैशाअभावी तोंडाजवळ आलेला घास हिरावून जातो की काय या विवंचनेत मी गटांगळ्या खात होतो.
मला शाळेत एक कविता होती.
'तदितर खग भेणे वेगळाले पळाले…….
कठिण समय येता कोण कामास येतो।'
या कवितेची नेमकी आठवण झाली.
मी खुप विचारात गढलो असतांना एकाएकी तुळशीरामदादा- माझ्या मोठ्या आईचा मुलगा, याचं नाव आठवलं. तो एक आशेचा किरण दिसला. म्हणून मी त्याला विचारलं. त्यानं कोणतेही आढेवेढे न घेता सोन्याची अंगठी गहाण ठेवून चाळीस रुपये आणून दिले. माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं. त्याचे हे उपकार मी कधीही विसरलो नाही.
त्याकाळात समाजात शिक्षणाचं प्रमाण तोळा-मासाएवढं... त्यातही गळती… काॅलेजपर्यंत पोहचणा-यांचं प्रमाण अगदी अल्प… नोकरी मिळविण्यासाठी मरणाची ओढाताण… म्हणजेच नोकरीवर लागलेले मुलं अगदी बोटावर मोजण्याइतपत दिसत होते.
मला नोकरी लागल्याने माझी किंमत वाढली होती. गावात सर्वांनाच मोठं कौतुक वाटत होतं. त्यावेळी वाघाडी नदीवर धरणाचं काम जोरात सुरू होतं. बाबा भजे बनवून या धरणावर विकायला नेत होता. त्यामुळे माझ्या नोकरीची बातमी तेथेही वा-यासारखी पसरली होती. मी त्याच्यासोबत तेथे गेलो; तेव्हा 'हाच काय भजेवाल्याचा पोरगा' म्हणून माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते.
'पोरगा शिकला, नोकरी लागली, मोठं बिन्नीचं काम केलं ...'
'गावाचं नाव कमावलं…' असे बोलून माझी वाहवा करीत.
'नोकरी म्हणजे बिनपाण्याची शेती, बारमाही पिकते... असे लोक बोलून दाखवत.
'पाणी नाही आला तरी नोकरी बुडत नाही. पण आमची शेती मात्र बुडते !'
'कितीही दुष्काळ पडला तरी पगार काही थांबत नाही…!' 'आता काय, रामराव… तुही काया पालटली, बावा...' असे म्हणून गौरवाने माझ्या पाठीवर थाप मारत.
खरंच, मला पण खुप आनंद झाला होता.
आई, बाबा, शामरावदादा, माझी वहिनी अनुसयाबाई व बहिण जनाबाई यांनी माझ्या शिक्षणासाठी उपसलेल्या कष्टांचं चिज झालं होतं.
लग्नाला आलेली मुलगी आई-बापाला ओझंच वाटते. ती सुखात पडावी असं प्रत्येक आई-बापाला वाटणे साहजिकच असते. नोकरीवाला नवरा मिळावा, ही मुलीची पण सहज इच्छा असते. म्हणून आई-बाप तसा प्रयत्न करतात, त्यात वावगं काहीही नसतं.
पण मी अद्याप लग्नाच्या बाजारात उतरलो नसतांना सुद्धा माझ्या लग्नाची एकतर्फी चर्चा गावात सुरू झाल्या होत्या, ही गोष्ट मला जरा विचीत्रच वाटली होती.
'रामराव माह्या पोरीला मागल तर मी इतका हुंडा देईन' अशी अहमहमीका मामा व गावातील चिरकुटा जो माझ्या गावनात्यात मामा लागत होता, यांच्यात सुरू झाल्याचे माझ्या कानावर आले होते.
श्रीमंत पोरींचे बाप कफल्लक पण आता नोकरीवर लागलेल्या पोरांच्या मागे हुंडा घेवून कसे फिरतात, त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणता येईल. हुंड्याची ही कीड समाजात पसरत चालली होती. श्रीमंत बाप नोकरीवाल्या पोरांना विकत घेऊन पोरी खपवण्याचा प्रयत्न करीत होते. पोरगा पाहायला कसाही असो, त्याची घरची परिस्थिती कितीही फाटकी असो, पण तो नोकरीवर आहे ना ! मग त्याला पोरगी द्यायला हरकत नाही. अशी भावना पोरीच्या आई-बापाची असायची.
तोच खेळ माझ्याही बाबतीत सुरू झाला होता. मला नोकरी लागली म्हणून हुंड्याच्या गोष्टी करून पैशाचे आमिष दाखवीणे, याची मला खुप चिड आली होती.
हिरा अगदी निरागस आणि सोज्वळ स्वभावाची होती. मी जसा लाजाळू होतो, तशीच ती पण काहीशी होती. त्यामुळे आमच्यात फारसं मोकळेपणाने संभाषण होत नव्हतं.
माझी पुतनी संघमित्रा… हिच्या बरोबरीच्या मैत्रिणी माझ्या घराच्या अंगणात खेळायला अथवा नट्टा-पट्टा करायला जमत. त्यात हिरा पण असायची. माझ्या घराचं अंगण मोठं होतं. भोवताल भिंतीचं आवार असल्याने मुलींना सुरक्षित वाटायचं.
गावात कासार, मनेरीवाला आलेत की, ते आमच्या अंगणात बस्तान मांडत. मग आजुबाजुच्या बाया-मुली बांगड्या भरायला अथवा मनी डोरले घ्यायला या अंगणातच जमा होत.
मामेबहिण या नात्याने माझे लंगोटी मित्र माझी थट्टा करीत; तेव्हा मी लाजत होतो. माझी जशी थट्टा करीत होते, तशीच थट्टा हिराच्या मैत्रीणी सुद्धा करीत नसतील, कशावरून? या काल्पनिक भावनेत माझं मन उगीचच गुंतून जात होतं. ते वयच होतं तसं ! पण एक खरं की, आमच्यात कोणत्याही प्रकारच्या प्रेमाच्या भावना दडलेल्या नव्हत्या. पण हिराचं मन मला थोडंच वाचता येत होतं?
पुर्वी भावाला मुलगी झाली की, बहिण भाचीच्या बेंबीला कुंकू लावून सोयरसंबंध जुळवून ठेवत असत, म्हणे… पण आजच्या काळात तसं काही राहीलं नव्हतं. पण मुलं लग्नायोग्य झाल्यावर मात्र तसे सोयरसंबंध जुळवाजुळव करायला जवळचे नातलग कामाला लागत, हे मात्र खरं होतं.
मामा-मामी घरात माझ्या संबंधाच्या गोष्टी करीत असतांना हिराला पण माहीत पडले असेलच. कारण अशा गोष्टी काही लपून राहत नाहीत. माझ्याही घरात माझे आई-बाबा जनाबाईच्या लग्नाच्या गोष्टी करत; तेव्हा आम्हाला माहिती पडतच होतं.
यामुळे हिराही आपल्या मनातल्या मनात माझ्याबाबतीत आशा बाळगून असली तर चुकीचं काय होतं ?
मामाने शामरावदादाकडे माझ्या लग्नासाठी विचारून पाहीले होते. हिराला मागत असाल तर मी हुंडा देतो, असं म्हणाला होता. दादाने, 'तुच रामराव घरी आला की, विचारून पहा ना...' असे बजावले होते.
ही गोष्ट दादाने मला सांगितली होती. शिवाय मी गावाला आलो, तेव्हा फकीरादाजींनी हा विषय छेडला होता. फकीरादाजी म्हणजे माझ्या मोठ्या आईचा जावई... गावातला बोलका माणूस… लग्न व्यवहार जुळविण्यात तो वाकबगार होता. म्हणून लोक अशा गोष्टी त्यांना सांगून लग्नाची जुळवाजुळव करीत असत.
दाजी मला म्हणाला,
'रामराव तु हिराला मागत असशील तर तुवा मामा तुला हुंडा द्यायला तयार आहे.'
'दाजी, हुंड्यासाठी मी भुकेला नाही. खरं म्हणजे हुंडा पद्धत मला मुळीच आवडत नाही. दुसरं असं की, मी आताच लग्न करणार नाही. नोकरी लागून मला जेमतेम एक वर्ष झालं असेल. मला आणखी काही वर्षे नोकरी करून आमची खालावलेली परिस्थिती सुधरायची आहे. त्यानंतरच मी लग्नाचा विचार करीन. म्हणून माझ्या भरोशावर राहू नका, असे निर्वाणीचे मामाला सांगून टाक.'
खरं म्हणजे हिरा जेव्हाकेव्हा माझ्या घरी यायची तेव्हा घरात शिरतांना 'आत्या, आत्या' करीतच यायची. माझ्या आईवर तिचा मोठा जीव होता. आईच्याही ती लाडाची होती. या दोघी आत्या-भाचीचं मस्त पटायचं. पण माझ्या मामीचा स्वभाव आडवा येत होता, ना...
मामी म्हणजे मागचा पुढचा विचार न करता टचकन बोलून टाकणे या स्वभावाची… ज्याला फटकळ स्वभाव म्हणतात… त्यामुळेच आम्ही तिच्यापासुन दोन हात दुरच राहत होतो.
म्हणून आमच्या घरात कोणी 'होय' म्हणत नव्हते की 'नाही' म्हणत होते ! अशी तटस्थपणाची भुमिका सर्वांनी अंगीकारली होती.
आमच्या नात्यातील धागे जर घट्ट विणल्या गेले असते तर कदाचित चित्र वेगळही उमटले असते. पण नियतीला ते मान्य नव्हतं असेही म्हणावे लागेल. सारं काही परिस्थितीवर अवलंबून असतं, असं जे म्हणतात ते खरंच आहे.
काही दिवसांनी हिराचं लग्न जुळलं. नोकरीवालाच जावई मिळाला, ही समाधानाची बाब होती. पण पहिल्या बाळंतपणात तिचं असं दुर्दैवी निधन व्हावं, ही घटना अकल्पित आणि अतिशय दु:खदायी होतं.
त्यादिवशी मी माझ्या घराच्या अंगणातील ओट्यावर बसलो होतो. मामी आवाराच्या दरवाज्यातून आतमध्ये येतांना दिसली. तिचा चेहरा रडवेला दिसत होता.
मला पाहून हुंदके देत माझ्याजवळ आली.
माझा गळा पकडून,
'रामराव, तुम्ही माह्या पोरीले मागीतले असते तर माही हिरा मेली नसती गा…'
असे म्हणून हमसून हमसून रडायला लागली.
मला पण गहिवरून आलं.
वातावरण अत्यंत धिरगंभीर झालं.
मामी थोडी शांत झाल्यावर मला पुन्हा म्हणाली,
'रामराव, माही हिरा तुमच्या घरात सुखात राहीली असती गा...!'
'माझं मन म्हणते, ती अशी मेलीच नसती…'
मी एकदम अवघडलो.
थोडावेळ थांबून आणखी म्हणाली,
'काय करावं…?' एक उसासा टाकला.
'तिचं नशिबच तसं असेल ! त्याला तुम्ही काय करणार...?'
माझ्या तोंडातून शब्दही फुटत नव्हतं.
मामीची समजूत कशी काढावी तेच कळत नव्हतं.
पण मामीचं हे बोलणं ऐकून मी अंतर्मुख झालो.
अपराधी भावनेनं मी अस्वस्थ झालो.
लेखक- आर.के.जुमळे
दि.१०.५.२०२०
No comments:
Post a Comment