गळ्यात मणी-डोरल्याची पोत घातलेली, हातात फुगलेला झोरा धरलेली एक पोरसवदा युवती रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडाखाली भिरभिर कुणाची तरी वाट पाहत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव उमटले होते. एवढ्यात गावाच्या दिशेने येणारा एक पोरगा तिच्या नजरेस पडला. तिचा चेहरा खुलला.
ती धापा टाकत त्याच्याजवळ आली आणि म्हणाली,
“ए पोराss कुठे चाललास?”
“मी ना... खेडगावला चाललोय.”
“अरे थांब रे! मलाही यायचं आहे तिकडेच. आता अंधार पडेल ना, म्हणून कोणीतरी येईल म्हणून वाट पाहत होती. बरं झालं तू भेटलास.”
तिच्या बोलण्यातून त्याला कळलं — ती त्याच्याच गावातली, गवळ्याची सून होती. तिच्या घरी दुधदुपतं होतं. ती दुध-दह्याचं लोणी बनवून या लहानशा शहरात विकायला आणत असे. तिच्या सोबतीनी आधीच निघून गेल्या होत्या; ही मात्र उशिरा निघाल्याने मागे पडली होती.
ती दिसायला काळसावळी, पण नाकीडोळीने उठावदार होती. सुंदर काठपदराचं, पायघोळपर्यंत चोपूनचापून नेसलेलं लुगडं तिच्या अंगावर उठून दिसत होतं. दिवाळीच्या सणाचं सामान आणि उधारीची वसुली करताना तिला उशीरच झाला होता.
तसा खेडगावला जाणारा हा रस्ता दिवसा वाहता राहत होता. कोणी नाही कोणीतरी काही कामानिमित्त जात येत राहत होते. पण अंधार पडला की क्वचितच या रस्त्याने जात. म्हणून तिला वाटत होतं की कुणीतरी जाताना भेटेलच. म्हणून ती रस्त्याच्या बाजूला झाडाच्या खाली भिरभिर वाट पाहत होती.
राजू लहानपणापासून शहरातच शिकायला होता. त्याचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जात होता. सुट्ट्यातही तो शहरात कुठल्यातरी दुकानात काम करून आई-वडीलांवर पडणारा शिक्षणाच्या खर्चाचा भार हलका करत होता.
राजूचं काॅलेजचं हे शेवटचं वर्ष होतं. तो होस्टेलमध्ये राहत होता. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. म्हणून तो दिवाळीची खरेदी करून उशिराच गावाला जायला निघाला होता.
एस.टी.ने तो जवळच्या शहरात आला आणि तिथून त्याचं गाव एका कोसावर असल्याने पायीपायी निघाला.
खेडगावचा हा रस्ता दिवसा नेहमीच गजबजलेला असे. पण संध्याकाळ झाली की वर्दळ थांबायची. म्हणून ती कुणीतरी भेटेल या आशेने झाडाखाली थांबली होती. चंद्राचा उजेड असला की या रस्त्याने रात्रीला जायला काही भीती वाटत नव्हती, पण आजची अमावास्येची सावट पसरलेली काळोखी रात्र होती. म्हणून नाही म्हटलं तरी अनामिक भीती वाटत होती.
दोघांनीही याआधी कधी एकमेकांना पाहिलं नव्हतं. म्हणून ते एकदुसऱ्यांना ओळखतही नव्हते.
राजू लाजरा आणि बुजऱ्या स्वभावाचा. रस्त्यात तो तिच्याशी फारसा बोलत नव्हता.
ती पण राजू नवखा असल्याने त्याच्याशी बोलायला ती संकोचत होती. दोघेही मौन धारण करत खेडगावाची पायवाट तुडवत निघाले होते.
हे गाव गेल्यावर एक बरड लागत होतं. सूर्य त्या बरडाच्या आड लपून हळूहळू खाली सरकत होता. त्याचा आकार व लालभडकपणा वाढत जावून क्षितिजाला टेकत होता. तांबूस, जांभळे, लालसर असे चित्रविचित ढग दिसत होते. सूर्याच्या मावळत्या किरणांनी आसमंतात सोनेरी रंग भरला होता. त्या प्रकाशकिरणांनी अजूनही परिसर उजाडून ठेवला होता. सूर्याचे अस्तित्व संपत चालल्याची जाणीव मात्र अस्वस्थ करत होती. त्या संधीप्रकाशात वाट दिसेनासी झाली होती. दूरवर चमचम करणार्या चांदण्या वाट दाखवीत होत्या. पण त्यादेखील लुप्त झाल्या होत्या. हळूहळू अंधारलेला काळोख सार्या परिसराला कवेत घेत होता.
एव्हाना वारा निस्तब्ध झाला होता. पाखरं मोठ-मोठ्या झाडावर रात्रीच्या राहुटीला एकत्र जमले होते. त्यांचाही किलबिलाट मंद होत गेला.
अंधार आणखीनच गडद झाला. जवळचा माणूस दिसत नव्हता. पायवाटेवर अधूनमधून दगडं, काटेरी झुडपं होती. पण नेहमीचा जाण्या-येण्याचा रस्ता असल्याने वाट चुकत नव्हता. मोठा दगड आला की पाय मात्र ठेचाळत होता. तिला अंधाराची बहुतेक भीती वाटत असावी. म्हणूनच ती त्याला खेटून चालत होती.
ती त्याला पुन्हा पुन्हा म्हणत होती,
“अरे, हळू चाल ना, एखाद्यावेळेस पडेल मी.”
तिच्या आवाजात भीतीचा कंप स्पष्ट जाणवत होता. काही वेळाने एका ठिकाणी तिचा पाय दगडावरून घसरला; ती पडणार इतक्यात राजूने तिला धरून सावरलं. क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या. त्या क्षणी काळ स्थिरावला जणू. ती नवयौवना, तो नुकताच तरुणाईच्या उंबरठ्यावरचा तरणाबांड. त्या स्पर्शाने राजूच्या अंतरात काहीतरी दाटून आलं. पण त्याने स्वतःला आवरलं — कारण त्याला ठाऊक होतं, “माणसाची एक पायरी चुकली की तो अखंड अंधारात कोसळतो.”
वातावरण निस्तब्ध झालं होतं. फक्त रातकिड्यांचा किर्रकिर्र आवाज, पाखरांच्या पंखांची फडफड आणि अधूनमधून झुडपांतून उठणारी खुडखुड ऐकू येत होती.
पाखरांना अंधार्या रात्रीची भीती का वाटत नाही? माणसांनाच का वाटते? आपण ज्या रस्त्याने जातो, त्याची दिवसा भीती वाटत नाही, मग रात्रीलाच का वाटते? — राजूच्या मनात विचार आला.
कुठे खुडखूड वाजले की अंगावर सरसरुन काटे उभे होत. लहान-मोठ्या झाडा-झुडपाच्या सावल्या चित्रविचित्र दिसत होत्या. कोणीतरी उभे असल्याचे पण जवळ गेल्यावर सावली असल्याचे लक्षात आल्यावर भीतीने पोटात उठलेला गोळा निवळत होता.
कधी मधातच काजवा ऊजेडाची उघडझाप करीत चमकून जात होता. थोडासा का होईना बंद चालू होणार्या बिघडलेल्या बॅटरीप्रमाणे अंधारात उजेड पाडून जात होता. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार वाटत होता.
या रस्त्याने रात्रीबेरात्री विंचु-काट्यांची, सापाची किंवा हिंस्त्र पशु-पक्षांची जेवढी भीती वाटत नव्हती, त्यापेक्षा भुता-खेतांची, चकव्या-लावडिनीची जास्त वाटत होती. कारण अशा भीतीदायक गोष्टी लहानपणापासून खूप ऎकल्या होत्या. त्या मनाच्या कोपर्यात घट्ट जाऊन बसल्या होत्या. अशा भयान रात्रीला त्या हमखास बाहेर येत होत्या. मग भीतीने आणखीनच कापरे भरत.
रस्ता आता अर्ध्यावर आला होता. वाटेत नदी लागली. नदीच्या काठावरील आजुबाजुला दाट झाडी होती. नदीत उतरण्यापूर्वी थोडावेळ स्तब्ध राहून दोघांनीही कानोसा घेतला.
काठावर घसरण असल्याने दोघेही एकमेकांच्या हाताला हात धरूनच नदीत उतरले. पाणी गार होतं. नदीच्या खळखळाटात एक प्रकारची रहस्यमय शांतता होती.
दिवसा निखळ आनंद देणारा खळखळाट आत्ताच्या शांत वातावरणात भीतीदायक वाटत होता. दोघेही नदीचे पाणी पिले. बाजारहाटला जाताना वाटसरू या नदीचे पाणी पिऊन तहान भागवत होते.
नदीचं पाणी गोड होतं. त्याची एक आख्यायिका होती. ती कथा त्याची मोठी आई टेंभुर्णीचे पाणे चवडताना तिखटमीठ लावून सांगत होती.
नुकतेच लग्न झालेले दोघे नवरा-बायको होते. तो तिला शहरात हप्त्याच्या बाजारासाठी पाठवतो. जाताना सारेच लोक त्या नदीचं गोड पाणी पिऊन तृप्त होतात. बाजार करून आल्यावर तिला हे पाणी नवऱ्याला पण दिलं पाहिजे म्हणून ती काचेच्या शिशीतील विकत आणलेलं तेल उबडून त्यात नदीचं पाणी भरते. घरी आल्यावर ती नवऱ्याला ही गोष्ट सांगते. तो तिच्या मुर्खपणावर कमालीचा कातावून तिची धुलाई करतो.
नदीचा डोह खोल होता. त्या डोहात लंगोटी मित्रांसोबत तो कित्येकदा पोहला होता.
त्यावेळी चकव्याची भीती वाटत नव्हती. पण आत्ता त्याच्या आठवणीने त्याचं सर्वांग शहारत होतं. अंगावर सरसरून काटे उभे राहिले होते.
चकव्याची अशीच एक गोष्ट गावात सांगितली जात होती. एका नवरदेवाला रात्रीला उठवून त्याला नदीवर नेले होते. तेथे त्याचे कपडे काढून डोहात ढकलून दिले. अशा भुताखेतांच्या व चकव्याच्या गोष्टी हमखास अशा प्रसंगात आठवत असे.
पाणी पिऊन दोघेही पुढे चालू लागले. नदी पार करताना तिचा तोल पुन्हा गेला, राजूने तिचा हात घट्ट धरला. नदीच्या बाहेर पडताना त्याचाच हात धरुन ती चढन चढली.
नदी पार केल्यावर पुढे शेतातून पायवाट लागली. ती आता बिनधास्तपणे त्याचा हात धरून त्याच्या मागेमागे चालत होती. राजू पोरसवदा असल्याने त्याच्या स्पर्शाचं तिला काहीच वाटत नव्हतं.
जवारीचे धांडे माणसाच्या उंचीऐवढे वाढले होते. ती नदीची चढन आणि वाट चालून दमासून गेली होती. त्याच्या हाताला न सोडता ती तशीच खाली बसली. ती का बसली हे त्याच्या लक्षात आलं. कारण त्याच्या पायापर्यंत गरम पाण्याचा लोट आल्याचं त्याला जाणवलं होतं.
गावाची शीव जवळ येताच मातीचा गंध अधिक दाट झाला. रस्त्याच्या कडेला रचलेल्या खतांवरून येणाऱ्या शेण-मुतांच्या कुबट वासाने नाक भणभणलं; वाऱ्याच्या झोताबरोबर हागणदारीचा नकोसा गंध मनाला स्पर्शून गेला. कुडामातीच्या घरांच्या ओबडधोबड भिंतींमधून दिव्यांची मिणमिणती ज्योत अंधाराला चिरत बाहेर डोकावू लागली. रात्र शांततेच्या आच्छादनाखाली स्थिरावली होती; पण राखणदार कुत्र्यांना पावलांची चाहूल लागताच ते खडबडून उठले आणि एका सुरात भुंकू लागले. क्षणभर त्यांच्या आवाजाने संपूर्ण गाव जागं झाल्यासारखं वाटलं; पण ओळखीचा वास लागताच ते पुन्हा चिडीचूप झाले — जणू रात्रीच्या अंधाराने त्यांच्या शांततेला पुन्हा आपल्यात सामावून घेतलं.
तिने आतापर्यंत मनाच्या खोल तळाशी दडवून ठेवलेला प्रश्न शेवटी ओठांवर आणला.
क्षणभर ती थबकली. मनात काहीतरी हालचाल झाली, तरीही ती आवरू शकली नाही.
मंद स्वरात, थोड्या संकोचाने थरथरणाऱ्या ओठांनीच तिनं विचारलं —
“बाबू, तू कोणाचा पोरगा आहेस रे…?”
प्रश्न ऐकताच त्याच्या मनात एक ठिणगी चमकली. तो ओळखून गेला — हा साधासुधा प्रश्न नव्हता; हा तिच्या मनातल्या जात जिज्ञासेचा आवाज होता. या लोकांना जोपर्यंत समोरच्याची जात माहीत होत नाही, तोपर्यंत माणूस म्हणून ते त्याला पाहतात. पण एकदा का जातीचा ठपका लागला, की सगळं काही बदलून जातं — नजरा, बोलण्याची लय, आणि माणुसकीची उबही.
त्याला हे सारं ठाऊक होतं; त्या काळात जातीभेदांची नांगरणी इतकी खोलवर रुजलेली होती, की माणूस, माणूस म्हणून उरत नव्हता.
तो थोडा हसत म्हणाला —
“का बरं, बाईss… तू हे का विचारत आहेस?”
ती क्षणभर चमकली. प्रश्नानं तिच्या मनातली गोष्ट उघडी पडेल या भीतीनं ती वेळ मारून नेण्याच्या सुरात म्हणाली —
“नाही रे… काही नाही. ओळख म्हणून विचारलं. इतकंच.”
तो हलकेच हसला, पण आवाजात उपरोधाची धार होती —
“नाही, तू खोटं बोलतेस. खरं म्हणजे तुला माझी जात जाणून घ्यायची आहे, बरोबर ना?”
ती निःशब्द झाली. तिच्या नजरेत अपराधाची छटा तरळली आणि शब्द ओठांवरच गोठले.
तो पुढे म्हणाला —
“मी शाळा–काॅलेजात शिकलोय. मी तुमच्यासारखे जातीभेद, शिवाशीव मानत नाही. तुम्ही मानता त्या खालच्या जातीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने तुमच्यासारख्या स्त्रियांवर फार मोठे उपकार केले आहेत. त्यांनी स्त्रियांना समानतेचा दर्जा दिला, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, आणि संविधानाच्या लेखणीने अस्पृश्यतेचा शाप मुळातूनच उपटून फेकून दिला.”
पुढे तो म्हणाला,
“समजा, मी तुला सांगितलं की मी बौद्ध आहे — तर तुला विटाळ होईल का? तू भररस्त्यात माझा हात धरून चाललीस, माझा हात धरूनच लघवीला बसलीस, आता तोच हात अपवित्र झाला म्हणून तू तो कापून टाकशील का?
तू पडणार होतीस तेव्हा मीच तुला धरून सावरलं — मग तुझं अंगही बाटलं, मग तुझ्या अंगाचं काय करणार?”
त्याचे शब्द जणू धगधगत्या निखाऱ्यांसारखे तिच्या कानावर पडले.
ती काहीच बोलली नाही. नि:शब्दपणे वळली, आणि रात्रीच्या अंधारात कधी अदृश्य झाली ते त्यालाही समजलं नाही.
त्याच्या कानात मात्र अजूनही तिच्या पावलांचा मंद आवाज घुमत राहिला —
तो आवाज होता तिच्या गोंधळलेल्या मौनाचा, अपराधाच्या सावलीत हरवलेल्या भावनांचा. अन् त्याच्या जळजळीत शब्दांचा…
त्यांचा एकत्र प्रवास येथून फुटला.
ती तिच्या वेटाळाकडे वळली. हा त्याच्या वेटाळाच्या दिशेने चालू लागला.
लेखक- आर.के.जुमळे
No comments:
Post a Comment