Thursday, 23 October 2025

भाताच्या गंजाची चोरी

 

 

  

ही सत्य घटना आहे. ती  मी कथेच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला  आहे.  

 

त्यावेळी मी वणी जि.यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या उपविभागीय कार्यालयात सहाय्यक लेखापाल या पदावर नोकरीला होतो.

मी सकाळी कार्यालयात येतांना एसटी स्टँडच्या बाहेर गेटजवळील मैदानावर काही भटक्या जमातीचे पाल पाहत होतो. आज मात्र  तेथे गर्दी दिसल्याने थबकलो. मी ते दृश्य पाहून सुन्न झालो. माझं संवेदनशील मन कमालीचं चरफडलं, हळहळलं… म्हणून  मी त्या दृश्याला आकार देऊन कथा गुंफण्याचा प्रयत्न केला. ही घटना १९८८ या वर्षातील आहे. तरी त्या काळाचा संदर्भ लक्षात घेऊन  ही कथा वाचावी.

⏺⏺⏺

बरं, ही कथा लिहण्यास मी का प्रेरीत झालो? त्याची   पार्श्वभूमी पण सांगतो-

ही घटना पाहून मला का कॉलेजच्या होस्टेलची नेमकी आठवण झाली. या पोराने पोटाची खळगी भरण्यासाठी भाताच्या गंजाची चोरी केली होती, तशीच चोरी आम्ही होस्टेलचे मुलं पण सर्रासपणे  करीत होतो. आम्ही जेवायला मेसमध्ये जात होतो. तेथे जेवता जेवता कुणाचं लक्ष नाही असं पाहून चुपचापपणे  पैजामा/पँटच्या खिशात पोळ्या किंवा हायब्रीडच्या भाकरी  कोंबत होतो. मेसमधून बाहेर पडलं की,   खिसे फुगलेले दिसायचे. त्याला लपवत लपवत खोलीवर येत होतो.

आमच्या होस्टेलमधील काही मुले अर्थाजनासाठी कापसाच्या जिनात काम करीत असत. आम्हाला स्कालरशिप जी मिळायची तिचा आमच्या खर्चासाठी काहीही उपयोग होत नव्हता. ही स्काॅलरशिप दिवाळीची सुट्टी लागत होती तेव्हा व वार्षिक परिक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी जातांना अशी दोनदा मिळायची. काॅलेजची फी व होस्टेलच्या राहण्याची व जेवण्याचा खर्च कापून थोडेफार पैसे शिल्लक राहत ते घरी खर्च होत होते.

माझ्यासारखेच बहुतेक मुले गरीबीत शिक्षण घेत होते. कपडे, पुस्तके, वह्या, तेल, साबना इत्यादी  खर्चासाठी पैशाची गरज पडायची, ती बाहेरची कामे करून भागवित होतो.

मी कापसाच्या जिनात रात्रपाळीमध्ये काम करत होतो. माझा लहान भाऊ शाळेत शिकत होता. (आज तो एमबीबीएस, एमएस डाॅक्टर झाला आहे.) त्याला होस्टेलमधे टाकले होते. पण तेथे त्याची खाण्यापिण्याची व राहण्याची फारच गैरसोय होत होती. म्हणून त्याला माझ्याजवळ  ठेवले होते. संध्याकाळचा  माझा डब्बा कोणीतरी मुलगा आणून देऊन तो अर्धा खाऊन अर्धा माझ्यासाठी घेऊन येत होता. हा जीन शहराच्या दुस-या टोकावर असल्याने खुपच लांब होतं.  तितक्या दूर त्याला रात्रीच्या वेळी येण्या-जाण्यासाठी  खुप त्रास होत होता. हे मला पाहवल्या जात नव्हतं.  म्हणून मी ते बंद करून मीच सकाळी चोरून आणलेल्या पोळ्या/भाकरी दुपारी जीनात येतांना घेऊन येत होतो. जेवणाच्या सुट्टीत भजे विकत घेऊन त्याच्यासोबत खात होतो. असाच प्रकार सर्वच मुले करीत असत.  जर ही चोरी उघडकीस आली असती व मॅनेजरने जर पोलिसात रिपोर्ट दिला असता तर आमचीही अवस्था या कथेतील पोरासारखी झाली असती. या कल्पनेने हे दृश्य पाहतांना मला दरदरून  घाम फुटला होता. अंगावर शहारे उमटले होते. म्हणून ही कथा सहजपणे माझ्या लेखणीत उतरली.

⏺⏺⏺

 

*भाताची चोरी*

तो तारुण्याने मुसमुसलेला, कसदार शरीराचा, ओठावर मर्दानकीचे प्रतिक असलेला, त्याच्या उघड्या शरीरावरचा एकेक स्नायू तणावग्रस्त वाटावा असा हा स्वतंत्र भारतातील जवामर्द जवान, परंतु चोर ठरलेला...! दोरीने करकचून पाठीमागे बांधलेले दोन्हीही बलदंड हात तो सोडविण्याचा असफल प्रयत्न करीत होता. बारीकशा वेळूच्या माराने सर्वांगावर उमटलेल्या अन् धुळीने माखलेल्या रक्तीम रेखा जणूकाही त्याच्या जीवनाचा आलेख असावा याची साक्ष देत होत्या.

खरेच, कोणता गुन्हा केला होता त्याने की ज्यामुळे त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागत होत्या? मी पाहिलं, तेव्हा माझं डोकं चक्रावूनच गेलं... त्याने चोरी केली होती... काय असं चोरलं होतं, त्यानं...?? सोने, नाणे असे  काहीही चोरल्याचं दिसत नव्हतं. हो… पण  त्याने शिजलेल्या भाताचा गंज मात्र  चोरला होता आणि हेच काय ते महापातक त्याच्या हातून घडलं होतं... सोने, नाणे यापेक्षाही भात त्याला खुपच मौल्यवान वाटलं होतं.

भांडवलदाराचे, सत्ताधीशांचे पगारदार नोकर इमानेइतबारे त्या भारतीय तरुणाच्या चोरी प्रकरणाची शहानिशा करीत होते. जेथून गंज चोरला तेथे त्याला आणल्या गेले. हाताला काम नसलेली बरीच रिकामटेकडी माणसे सभोवताल जमा झाली होती. बेरोजगारांना काही तोटा नाही, याचं ते द्योतक होतं.

तो तंटयाभिल्लासारखा बिनधास्त सर्वांकडे नजर फिरवीत पाहत होता. त्याला रोजगार असता तर कशाला तो असा पोलिसांच्या कचाट्यात सापडला असता?

जीप घेऊन आलेले पोलीस मर्दुमकी गाजवू लागले. बाया-बापूड्यांनी डोळे विस्फारले. एक जबरदस्त पोलिसाचा घुटना त्याच्या पोटात बसला. तसा तो विव्हळला. ‘सांग हरामखोरा.’ असे म्हणून दुसऱ्या पोलिसाने त्याचे डोक्याचे लांब केसं ताकदीने ओढले. तो तोंडातून चित्कार फेकण्याशिवाय दुसरं काही करू शकत नव्हता. एका महाशूर पोलिसाने त्याचे डोके जीपच्या लोखंडी पत्र्यावर जोरात आपटले. हृदय पिळवटणारा त्याचा तो आर्त आक्रोश आसमंतात घुमला. निर्दयी क्रूर लांडग्यांनी असहाय बकरीच्या पिलाचे लचके तोडावे, असेच ते दृश्य भासत होते.

भारतीय नागरिकांशी रक्ताचे नाते असलेला मी एक पामर थरारून गेलो होतो. ही मोगलाई की पेशवाई ह्याची तुलना करू लागलो. जीपजवळ जावून आतमध्ये डोकावलो. तेथे ठेवलेल्या भाताचा गंज त्याच्या चोरीची साक्ष देत होता. शूरवीर पोलीसांचा चामडी पट्टा त्याचे रक्त पिऊन सुस्तावला होता. त्याच्या पाठीचा खरपूस समाचार घेऊन तडकलेली काठी तेथे आराम करीत होती.

किती मारठोक? तरी म्हणे, ‘त्याला काहीच होत नाही. पळतो, हुलकावणी देतो. अहो, काट्याकूट्यात लपतो. तरी काहीच होत नाही त्याला! आम्ही काट्याच्या झुडपातूनच त्याला बाहेर काढून आणले आहे. आमची पुरती दमछाक केली त्याने.’ असे छातीत हवा भरून एक पोलिस सांगत होता.

मला प्रश्न पडला. ‘काय हा तरुण माणूसच आहे ना? त्याला काय मन नाही? संवेदना नाहीत? स्वाभिमान, आत्मसन्मान काही, काही नाही त्याला??

चोरलेल्या अन्नाची धड चव त्याला घेता आली नाही आणि आता तो मार खावून खावून तुटल्यासारखा झाला होता. सर्वांगाच्या सा-या कळा त्याच्या चेहर्‍यावर उमटल्या होत्या. त्याचा चेहरा निस्तेज होवून सुध्दा त्याच्या डोळ्यात दयेची भिक दिसत नव्हती. याचनेचा भाव तर नव्हताच. मरीमाय पुढे कापण्यास आणलेल्या बकरीसारखा तो निश्चल उभा होता. विस्कळीत मन घेऊन क्षणाक्षणाला भेदरल्या सारखा तो पाहत होता. पोलिस त्याच्यावर रोखून पाहायला लागला की, तो लगेच टवकारत होता. प्रतिकार करण्याची वृथा उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.

माझे मन उदगारले, ‘शंबूका, रामापुढे तुझे काही चालेल का?’ स्वर्गप्राप्तीसाठी शंबूकाने तपस्येची चोरी केली होती आणि याने भुकेसाठी अन्नाची! मी स्वतःलाच म्हटले, ‘रामायण अद्याप संपले तरी कुठे? ते तर सुरूच आहे...’

त्याला मुडद्यासारखे जीपमध्ये टाकून सरकारी सेना निघून गेली होती. माझ्या ह्रदयाच्या स्पंदनाची गती काही केल्या कमी होत नव्हती. माझ्या नजरेसमोर बंदी शाळेतले खास ‘टॉर्चर रूम’ घुमले. अंधाऱ्या कस्टडीत त्याला बंद केले आहे. त्याच्या आर्त किंकाळ्या भिंतीला टक्कर देऊन परत त्याच्याच कानावर आदळत आहेत ! त्याचेच कान अन् त्याच्याच किंकाळ्या! त्याचे कानही कदाचित कंटाळले असतील, त्याच्या किंकाळ्या ऐकून! त्याचे मन आणि चामडी बधिर झाले असतील, मार खाऊन खाऊन…!!!

मित्रहो, तो म्हणे, नेहमीच जेलमध्ये असतो. कालच तो तेथून सुटून आला. आता परत त्याने जेलमध्ये जायची तयारी केली. बाहेर उपासी व उघड्यावर राहण्यापेक्षा त्याला जेलमध्ये खायला व राहायला मिळते. तो या प्रस्थापित वर्गाला जाहीररीत्या चौकाचौकात ओरडून का नाही सांगत की, हे सत्तासांडानो, तुम्ही माझ्या रिकाम्या हाताला काम का नाही देत? ह्या देशाचा सन्माननीय नागरिक म्हणून का नाही जगू देत? 

नाही... त्याच्या जीवनाची चाकोरीच वेगळी... जेलयात्रा, हेच त्याच्या जीवनाचं ध्येय ! सक्त मजुरीची शिक्षा मिळाली की तेथे काम मिळते ना... पोटाची खळगी भरण्यासाठी डुकरांनीही नाकारावे असे खाद्यान्न मिळते ना... स्वातंत्र्यांची चिंता नाही की गुलामगिरीची चीड नाही! भारतीय संस्कृतीने  लादलेला हाच त्याचा धर्म व धंदा ! चोरी करावी, पोलिसांची परीक्षा पास करावी व दयावंत न्यायाधीशाच्या कृपाप्रसादाने बिनभाड्याच्या प्रसादात प्रवेश करावा, हाच त्याच्या आयुष्याचा जन्मजात कार्यक्रम... अर्थात मृत्यूचा आदेश येईपर्यंत !

मित्रहो, या देशात काय कमी चोर आहेत?  प्रतिष्ठित, मान्यताप्राप्त व परवानाधारक स्मगलर्स आहेत. बाहेर देशात स्विसबँकेद्वारे पैसा नेणारे आहेत. नफेखोरी, साठेबाजी, काळाबाजार करणारे व्यापारी-दलाल आहेत. श्रमिकांचे रक्तशोषक उद्धोगपतीही आहेत. भ्रष्टाचारी कामगार-अधिकारी व पुढारी आहेत. कामचुकार करणारे कर्मचारी-अधिकारीही आहेत. दलितांना पायदळी तुडवीणारे, त्यांच्यावर अमानवी अत्याचार करणारे तथाकथित सनातनी, उच्चवर्णीय आहेत. स्त्रियांची अब्रू लुटणारे, हुंड्यासाठी त्यांना जिवंत जाळणारे धर्माधिकारीही आहेत. मात्र त्यांची अशी धिंड काढली जाते का? 

शिजलेल्या भाताचा गंज चोरल्यामुळे जशी पोलिसांची काठी रंघ्रारंघ्रात आग पेरते, तशी अवस्था ह्या हरामखोरांची होत असते का? ह्याच्या कितीपट शिक्षा त्यांना होते? नाही होत ! इतकेच नव्हे तर न्यायाचा आव आणून गोरगरिबाला सर्रासपणे ठोकणारे हे ठोकशाहीवादी सरकारी गुलाम भ्रष्टाचारापासून किती दूर आहेत? काय भ्रष्टाचार करणे म्हणजे चोरी नाही काय?

स्वातंत्र्याच्या ४१ वर्षानंतरही या देशात अन्नासाठी चोरी करावी लागते… ही किती मोठी शोकांतिका आहे. बाळंतपणाची व्यवस्था व्हावी म्हणून चोरीच्या माध्यमातून जेलमध्ये जाण्याचे डोहाळे लागतात आमच्या गरीब स्त्रीला ! तारुण्यात प्रेयशीची वाट पहावी, तशी नोकरी लागण्याची वाट पहावी लागते आमच्या भारतीय युवकाला ! आणि शेवटी निराश होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करतो ! केवढी ही स्वतंत्र भारतीयांची दुर्दशा  ! ४१ वर्षात हेच काय ते सत्ताधाऱ्यांच्या कर्तृत्वाचे विषमय फलित...???

भुके कंगाल कोण आहेत? बेकार-भटकणारे कोण आहेत? अन्याय-अत्याचार कुणावर होतो? गेल्या ४१ वर्षात दुःख आणि दारिद्र्यात कोण भरडल्या जातोय? गुलामी आणि लाचारीत कोण जगतोय? अर्थात ८५ टक्के बहुजन समाजच ना…

तो चोर बहुजन समाजाच घटक होता, यात तिळमात्र शंका नाही. कारण उच्चवर्णीयांवर  अशी पाळी कधीच येत नाही. बहुजन समाज  गरिबच राहावा व त्याने गुन्हेच करीत राहावे म्हणून हेतूपुरस्सर षडयंत्र रचल्या गेले आहेत. त्याला गुन्हेगारीच्या चक्रात अडकवून ठेवल्या जात आहे. शेटजी-भटजी-लाटजी सुखात लोळत आहेत. करोडोच्या संपत्तीत लोळणारी ही जल्लाद माणसे गरिबांच्या तोंडातला घासही हिसकावून घेतात. आणि तरीही त्यांचे सत्कार घडवून आणले जातात. पैसा व सत्ता त्यांची पाठराखण करतात. ते न्याय विकत घेतात, नव्हे तेच न्याय देतात आणि बहुजन समाजाचे शोषण करण्यास स्वैर व स्वतंत्र असतात. हिच या देशाची खरी वास्तवता आहे.

माझ्या नजरेसमोर तो मघाचा तरूण पुन्हा उभा राहिला. खरेच त्याला आत्मसन्मान नाही का? त्याला अर्ध नग्न करून, त्याचे हात बांधून, मारहाण करून गावात फिरविल्या जाते, केवढी ही गरिबांची विटंबना!

माझ्या भोवतालची गर्दी अजूनही कमी झाली नव्हती. मला ओरडावेसे वाटले, 'हे बहुजन बांधवांनो, अरे ही तुमचीच धिंड आहे. आज तुम्ही सुपात आहात, उद्या जात्यात जाल ! तुम्हाला मिळणार्‍या ह्या अमानूष वागणुकीचे हे भोग संपविणे तुमच्याच हातात आहे.'

बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, 'हक्क केवळ लढून आणि  लढूनच मिळतात.'

तेव्हा बहुजन बांधवा, 'अत्त दिप भव' हा मंत्र उराशी बाळगून, तू मुठभर सैतानाच्या मगरमीठीतून शिकून संघटीतरीत्या संघर्ष करून व शासनकर्ती जमात बणून मुक्त हो ! मुक्त हो !! मुक्त हो !!!

आर.के.जुमळे

वणी जि.यवतमाळ

दि. १८.२.१९८८

पोरा, तुहा मार वाचवण्यासाठी तुह्या बापाचा मार खाल्ला…

 

दिवसभराच्या कामाने थकून आई घराच्या दिशेने येताना पाहून पोरगा आनंदाने उड्या मारत तिच्याजवळ जाऊन हात धरला. दोघेही मायलेक झोपडीत पाय टाकत नाही तर दारूड्या नवऱ्याचा आवाज तिच्या कानावर पडला.

“आलीस… दे मले वीस रूपये. तीन दिसापासून दारूचा थेंब पोटात गेला नाय. माहा नरडा सुकला हाये.”

बायकोने काही उत्तर न देता आत जाऊन पाणी प्यायला लागली.

नवरा परत ओरडला.

“तुले आयकू आलं नाय काय?”

एक घोट पाणी पिल्यावर ती म्हणाली,

“नाही वो…  पैसे  नाही मिळाले.”

“खोटे बोलतेस. विस रूपये नसेल तर दहा तरी दे. तेवढ्यावरच भागवतो.” नवरा कडाडला.

“नाही वो… नाही मिळाले ना...” ती घाबरत घाबरत म्हणाली.

“तू अशी नाही देणार…” असं म्हणून तो ताणाताणात उठला आणि एक थापड दिली हाणून तिच्या कानफटात. तशी ती कळवळली. तो तिच्यावर तुटुन पडला. लाथाबुक्क्यांनी तिला तुडवू लागला. आई-बहिणीवर शिव्या देऊ लागला. पोरगा ओक्साबोक्शी रडू लागला. तो बापाला अडवत मायला जाऊन बिलंगला.

नवरा मारत होता. बायको त्याचा मार सहन करत होती. शेवटी तो थकून बडबडत तसाच एका कोपऱ्यात जाऊन शरिराची मुरकुंडी बांधून ताणून दिलं.

आईने चुलीजवळ जावून सकाळची राहीलेली कोरभर भाकर पोराला आणून दिली. पोरगा भूक नाही म्हणत तसाच न जेवता उपाशीपोटी झोपला. मायलेकांची भूक या प्रसंगाने मारून टाकली होती. नवऱ्याच्या रोजच्या कटकटीमुळे तिला जीव देऊन मरावसं वाटत होतं. पण पोरगा उघड्यावर पडेल म्हणून ती मुकाट्याने नवऱ्याचा मार सहन करीत होती. ती रात्रभर वेदनेने कण्हत होती.

सकाळी उठल्यावर पोरगा म्हणाला,

“माय वं, मी शाळेत जात नाय. मी फी आणली नाय, म्हणूनशानी मास्तर आज पण कालच्यासारखाच मारल.”

डोळ्यातले आसू पुसून माय म्हणाली,

“नाही रे पोरा… तुले मास्तराचा मार पडू नये म्हणूनशानी मी तुया बापाचा मार खाल्ला.”

तिने परकराच्या नाड्यात लपवून ठेवलेली वीस रुपयाची नोट काढून पोराच्या हातात दिली. तिच्या डोळ्याला आसवांची धार लागली होती. पोरगा तिचे डोळे पुसत म्हणाला,

“माय वं… मी शिकून मोठा झालो ना, की तुह्या डोळ्यात असे पाणी येऊ देणार नाय.”

मायनं रडत रडतच त्याला प्रेमाने जवळ घेतलं. ते दृष्य पाहून झोपडी सुद्धा हळहळली होती!

बहुतेक दारूड्यांच्या घरात असेच चित्र दिसत असते.

एक उदाहरण म्हणून सांगतोय. आई-बापाला एकुलता एक माझा नातेवाईक गावगाड्यात साधारणतः श्रीमंत म्हणून ओळखल्या जात होता. त्याच्याकडे शेती होती. तो गावात साधुपुरूष म्हणून गणल्या जात होता. परंतु एका दारूड्याच्या संगतीमुळे त्यालाही दारूचं व्यसन जडलं. मग काय घर म्हणजे नरक बनलं. तो बायकोलाच काय आईला पण त्रास देत होता. एकेदिवशी त्याने आईला मारायला कुऱ्हाड उगारली होती. त्याला पोलिसांच्या हवाली पण केलं होतं. पण काही उपयोग झाला नाही. शेवटी तो दारूतच मेला. असे लोक जगण्यापेक्षा मेलेले बरे असतात! त्यामुळे त्याच्या जाचातून कुटुंबाची सुटका तरी होते. आणखी असेच काही उदाहरणे सांगता येईल. पण जागा विस्ताराच्या भयामुळे ते टाळलेले बरे!

जगातली प्रत्येक आई आपल्या मुलांसाठी कुठलंही दुःख सहन करून त्याचं भवितव्य घडवीत असते, याची जाणीव मुलांनी ठेवली पाहिजे.

आई, मुलांना आपल्या गर्भात नऊ महिने सांभाळून अन् चालता बोलता होईपर्यंत ती स्वतःच्या ह्रदयाजवळ ठेवून त्यांना मोठं करत असते. मुलांना नेहमी आपल्या काळजात ठेवणारी आई जगात नसती तर मुलं मोठी झालीच नसती. म्हणून मुलांनी आईचा सन्मान करून तिला कधिच दुःख देऊ नये. हाच बोध या गोष्टीतून घेतला तरी पुरेसं आहे!

मातृदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!!!

आर.के.जुमळे

दि.११.५.२०२५

 

 

 

 

 

अंधाराच्या वाटेवर

 

गळ्यात मणी-डोरल्याची पोत घातलेली, हातात फुगलेला झोरा धरलेली एक पोरसवदा युवती रस्त्याच्या कडेला कडुलिंबाच्या झाडाखाली भिरभिर कुणाची तरी वाट पाहत उभी होती. तिच्या चेहऱ्यावर वैतागलेले भाव उमटले होते. एवढ्यात गावाच्या दिशेने येणारा एक पोरगा तिच्या नजरेस पडला. तिचा चेहरा खुलला.

ती धापा टाकत त्याच्याजवळ आली आणि म्हणाली,
 “ए पोराss कुठे चाललास?”
 “मी ना... खेडगावला चाललोय.”
 “अरे थांब रे! मलाही यायचं आहे तिकडेच. आता अंधार पडेल ना, म्हणून कोणीतरी येईल म्हणून वाट पाहत होती. बरं झालं तू भेटलास.”

तिच्या बोलण्यातून त्याला कळलं — ती त्याच्याच गावातली, गवळ्याची सून होती. तिच्या घरी दुधदुपतं होतं. ती दुध-दह्याचं लोणी बनवून या लहानशा शहरात विकायला आणत असे. तिच्या सोबतीनी आधीच निघून गेल्या होत्या; ही मात्र उशिरा निघाल्याने मागे पडली होती.

ती दिसायला काळसावळी, पण नाकीडोळीने उठावदार होती. सुंदर काठपदराचं, पायघोळपर्यंत चोपूनचापून नेसलेलं लुगडं तिच्या अंगावर उठून दिसत होतं. दिवाळीच्या सणाचं सामान आणि उधारीची वसुली करताना तिला उशीरच झाला होता.

तसा खेडगावला जाणारा  हा रस्ता दिवसा वाहता राहत होता. कोणी नाही कोणीतरी काही कामानिमित्त जात येत राहत होते. पण अंधार पडला की क्वचितच या रस्त्याने जात. म्हणून तिला वाटत होतं की कुणीतरी जाताना भेटेलच. म्हणून ती रस्त्याच्या बाजूला झाडाच्या खाली भिरभिर वाट पाहत होती.

 

राजू लहानपणापासून शहरातच शिकायला होता. त्याचा जास्तीत जास्त वेळ घराबाहेर जात होता. सुट्ट्यातही तो शहरात कुठल्यातरी दुकानात काम करून आई-वडीलांवर पडणारा शिक्षणाच्या खर्चाचा भार हलका करत होता.

 

राजूचं काॅलेजचं हे शेवटचं वर्ष होतं. तो होस्टेलमध्ये राहत होता. दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या. म्हणून तो  दिवाळीची खरेदी करून उशिराच गावाला जायला निघाला होता.

 

एस.टी.ने तो जवळच्या शहरात आला आणि तिथून त्याचं गाव एका कोसावर असल्याने पायीपायी निघाला.

खेडगावचा हा रस्ता दिवसा नेहमीच गजबजलेला असे. पण संध्याकाळ झाली की वर्दळ थांबायची. म्हणून ती कुणीतरी भेटेल या आशेने झाडाखाली थांबली होती. चंद्राचा उजेड असला की या रस्त्याने रात्रीला जायला काही भीती वाटत नव्हती, पण आजची अमावास्येची सावट पसरलेली काळोखी रात्र होती. म्हणून नाही म्हटलं तरी अनामिक भीती वाटत होती.

दोघांनीही याआधी कधी एकमेकांना पाहिलं नव्हतं. म्हणून ते एकदुसऱ्यांना ओळखतही नव्हते.

 

राजू लाजरा आणि बुजऱ्या स्वभावाचा. रस्त्यात तो तिच्याशी फारसा बोलत नव्हता.

ती पण राजू नवखा असल्याने त्याच्याशी बोलायला ती संकोचत होती. दोघेही मौन धारण करत खेडगावाची पायवाट तुडवत निघाले होते.

 

हे गाव गेल्यावर एक बरड लागत होतं. सूर्य त्या बरडाच्या आड लपून हळूहळू खाली सरकत होता. त्याचा आकार व लालभडकपणा वाढत जावून क्षितिजाला टेकत होता. तांबूस, जांभळे, लालसर असे चित्रविचित ढग दिसत होते. सूर्याच्या मावळत्या किरणांनी आसमंतात सोनेरी रंग भरला होता. त्या प्रकाशकिरणांनी अजूनही परिसर उजाडून ठेवला होता. सूर्याचे अस्तित्व संपत चालल्याची जाणीव मात्र अस्वस्थ करत होती. त्या संधीप्रकाशात वाट दिसेनासी झाली होती. दूरवर चमचम करणार्‍या चांदण्या वाट दाखवीत होत्या. पण त्यादेखील लुप्त झाल्या होत्या. हळूहळू अंधारलेला काळोख सार्‍या परिसराला कवेत घेत होता.

 

एव्हाना वारा निस्तब्ध झाला होता. पाखरं मोठ-मोठ्या झाडावर रात्रीच्या राहुटीला एकत्र जमले होते. त्यांचाही किलबिलाट मंद होत गेला.

 

अंधार आणखीनच गडद झाला. जवळचा माणूस दिसत नव्हता. पायवाटेवर अधूनमधून दगडं, काटेरी झुडपं होती. पण नेहमीचा जाण्या-येण्याचा रस्ता असल्याने वाट चुकत नव्हता. मोठा दगड आला की पाय मात्र  ठेचाळत होता. तिला अंधाराची बहुतेक भीती वाटत असावी. म्हणूनच ती त्याला खेटून चालत होती.

 

ती त्याला पुन्हा पुन्हा म्हणत होती,

“अरे, हळू चाल ना, एखाद्यावेळेस पडेल मी.”

तिच्या आवाजात भीतीचा कंप स्पष्ट जाणवत होता. काही वेळाने एका ठिकाणी तिचा पाय दगडावरून घसरला; ती पडणार इतक्यात राजूने तिला धरून सावरलं. क्षणभर दोघांच्या नजरा भिडल्या. त्या क्षणी काळ स्थिरावला जणू. ती नवयौवना, तो नुकताच तरुणाईच्या उंबरठ्यावरचा तरणाबांड. त्या स्पर्शाने राजूच्या अंतरात काहीतरी दाटून आलं. पण त्याने स्वतःला आवरलं — कारण त्याला ठाऊक होतं, “माणसाची एक पायरी चुकली की तो अखंड अंधारात कोसळतो.”

वातावरण निस्तब्ध झालं होतं. फक्त रातकिड्यांचा किर्रकिर्र आवाज, पाखरांच्या पंखांची फडफड आणि अधूनमधून झुडपांतून उठणारी खुडखुड ऐकू येत होती.

पाखरांना अंधार्‍या रात्रीची भीती का वाटत नाही? माणसांनाच का वाटते? आपण ज्या रस्त्याने जातो, त्याची दिवसा भीती वाटत नाही, मग रात्रीलाच का वाटते? — राजूच्या मनात विचार आला.

कुठे खुडखूड वाजले की अंगावर सरसरुन काटे उभे होत. लहान-मोठ्या झाडा-झुडपाच्या सावल्या चित्रविचित्र दिसत होत्या. कोणीतरी उभे असल्याचे पण जवळ गेल्यावर सावली असल्याचे लक्षात आल्यावर भीतीने पोटात उठलेला गोळा निवळत होता.

 

कधी मधातच काजवा ऊजेडाची उघडझाप करीत चमकून जात होता. थोडासा का होईना बंद चालू होणार्‍या बिघडलेल्या बॅटरीप्रमाणे अंधारात उजेड पाडून जात होता. तेवढाच बुडत्याला काडीचा आधार वाटत होता.

 

या रस्त्याने रात्रीबेरात्री विंचु-काट्यांची, सापाची किंवा हिंस्त्र पशु-पक्षांची जेवढी भीती वाटत नव्हती, त्यापेक्षा भुता-खेतांची, चकव्या-लावडिनीची जास्त वाटत होती. कारण अशा भीतीदायक गोष्टी लहानपणापासून खूप ऎकल्या होत्या. त्या मनाच्या कोपर्‍यात घट्ट जाऊन बसल्या होत्या. अशा भयान रात्रीला त्या हमखास बाहेर येत होत्या. मग भीतीने आणखीनच कापरे भरत.

 

रस्ता आता अर्ध्यावर आला होता. वाटेत नदी लागली. नदीच्या काठावरील आजुबाजुला दाट झाडी होती. नदीत उतरण्यापूर्वी थोडावेळ स्तब्ध राहून दोघांनीही कानोसा घेतला.

 

काठावर घसरण असल्याने दोघेही एकमेकांच्या हाताला हात धरूनच नदीत उतरले. पाणी गार होतं. नदीच्या खळखळाटात एक प्रकारची रहस्यमय शांतता होती.

 

दिवसा निखळ आनंद देणारा खळखळाट आत्ताच्या शांत वातावरणात भीतीदायक वाटत होता. दोघेही नदीचे पाणी पिले. बाजारहाटला जाताना वाटसरू या नदीचे पाणी पिऊन तहान भागवत होते.

 

नदीचं पाणी गोड होतं. त्याची एक आख्यायिका होती. ती कथा त्याची मोठी आई टेंभुर्णीचे पाणे चवडताना तिखटमीठ लावून सांगत होती.

 

नुकतेच लग्न झालेले दोघे नवरा-बायको होते. तो तिला शहरात हप्त्याच्या बाजारासाठी पाठवतो. जाताना सारेच लोक त्या नदीचं गोड पाणी पिऊन तृप्त होतात. बाजार करून आल्यावर तिला हे पाणी नवऱ्याला पण दिलं पाहिजे म्हणून ती काचेच्या शिशीतील विकत आणलेलं तेल उबडून त्यात नदीचं पाणी भरते. घरी आल्यावर ती नवऱ्याला ही गोष्ट सांगते. तो तिच्या मुर्खपणावर कमालीचा कातावून तिची धुलाई करतो.

 

नदीचा डोह  खोल होता. त्या डोहात लंगोटी मित्रांसोबत तो कित्येकदा पोहला होता.

 

त्यावेळी  चकव्याची भीती वाटत नव्हती. पण आत्ता  त्याच्या आठवणीने त्याचं सर्वांग शहारत होतं. अंगावर सरसरून काटे उभे राहिले होते.

 

चकव्याची अशीच एक गोष्ट गावात सांगितली जात होती. एका नवरदेवाला रात्रीला उठवून त्याला नदीवर नेले होते. तेथे त्याचे कपडे काढून डोहात ढकलून दिले. अशा भुताखेतांच्या व चकव्याच्या गोष्टी हमखास अशा प्रसंगात आठवत असे.

पाणी पिऊन दोघेही पुढे चालू लागले. नदी पार करताना तिचा तोल पुन्हा गेला, राजूने तिचा हात घट्ट धरला. नदीच्या बाहेर पडताना त्याचाच हात धरुन ती चढन चढली.

नदी पार केल्यावर पुढे शेतातून पायवाट लागली. ती आता बिनधास्तपणे त्याचा हात धरून त्याच्या मागेमागे चालत होती. राजू पोरसवदा असल्याने त्याच्या स्पर्शाचं तिला काहीच वाटत नव्हतं.

जवारीचे धांडे माणसाच्या उंचीऐवढे वाढले होते. ती नदीची चढन आणि वाट चालून दमासून गेली होती. त्याच्या हाताला न सोडता ती तशीच खाली बसली. ती का बसली हे त्याच्या लक्षात आलं. कारण त्याच्या पायापर्यंत गरम पाण्याचा लोट आल्याचं त्याला जाणवलं होतं.

गावाची शीव जवळ येताच मातीचा गंध अधिक दाट झाला. रस्त्याच्या कडेला रचलेल्या खतांवरून येणाऱ्या शेण-मुतांच्या कुबट वासाने नाक भणभणलं; वाऱ्याच्या झोताबरोबर हागणदारीचा नकोसा गंध मनाला स्पर्शून गेला. कुडामातीच्या घरांच्या ओबडधोबड भिंतींमधून दिव्यांची मिणमिणती ज्योत अंधाराला चिरत बाहेर डोकावू लागली. रात्र शांततेच्या आच्छादनाखाली स्थिरावली होती; पण राखणदार कुत्र्यांना पावलांची चाहूल लागताच ते खडबडून उठले आणि एका सुरात भुंकू लागले. क्षणभर त्यांच्या आवाजाने संपूर्ण गाव जागं झाल्यासारखं वाटलं; पण ओळखीचा वास लागताच ते पुन्हा चिडीचूप झाले — जणू रात्रीच्या अंधाराने त्यांच्या शांततेला पुन्हा आपल्यात सामावून घेतलं.

 

तिने आतापर्यंत मनाच्या खोल तळाशी दडवून ठेवलेला प्रश्न शेवटी ओठांवर आणला.

क्षणभर ती थबकली. मनात काहीतरी हालचाल झाली, तरीही ती आवरू शकली नाही.

मंद स्वरात, थोड्या संकोचाने थरथरणाऱ्या ओठांनीच तिनं विचारलं —

“बाबू, तू कोणाचा पोरगा आहेस रे…?”

 

प्रश्न ऐकताच त्याच्या मनात एक ठिणगी चमकली. तो ओळखून गेला — हा साधासुधा प्रश्न नव्हता; हा तिच्या मनातल्या जात जिज्ञासेचा आवाज होता. या लोकांना जोपर्यंत समोरच्याची जात माहीत होत नाही, तोपर्यंत माणूस म्हणून ते त्याला पाहतात. पण एकदा का जातीचा ठपका लागला, की सगळं काही बदलून जातं — नजरा, बोलण्याची लय, आणि माणुसकीची उबही.

 

त्याला हे सारं ठाऊक होतं; त्या काळात जातीभेदांची नांगरणी इतकी खोलवर रुजलेली होती, की माणूस, माणूस म्हणून उरत नव्हता.

 

तो थोडा हसत म्हणाला —

“का बरं, बाईss… तू हे का विचारत आहेस?”

 

ती क्षणभर चमकली. प्रश्नानं तिच्या मनातली गोष्ट उघडी पडेल या भीतीनं ती वेळ मारून नेण्याच्या सुरात म्हणाली —

“नाही रे… काही नाही. ओळख म्हणून विचारलं. इतकंच.”

 

तो हलकेच हसला, पण आवाजात उपरोधाची धार होती —

“नाही, तू खोटं बोलतेस. खरं म्हणजे तुला माझी जात जाणून घ्यायची आहे, बरोबर ना?”

 

ती निःशब्द झाली. तिच्या नजरेत अपराधाची छटा तरळली आणि शब्द ओठांवरच गोठले.

 

तो पुढे म्हणाला —

“मी शाळा–काॅलेजात शिकलोय. मी तुमच्यासारखे जातीभेद, शिवाशीव मानत नाही. तुम्ही मानता त्या खालच्या जातीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने तुमच्यासारख्या स्त्रियांवर फार मोठे उपकार केले आहेत. त्यांनी स्त्रियांना समानतेचा दर्जा दिला, माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळवून दिला, आणि संविधानाच्या लेखणीने अस्पृश्यतेचा शाप मुळातूनच उपटून फेकून दिला.”

 

पुढे तो म्हणाला,

“समजा, मी तुला सांगितलं की मी बौद्ध आहे — तर तुला विटाळ होईल का? तू भररस्त्यात माझा हात धरून चाललीस, माझा हात धरूनच लघवीला बसलीस, आता तोच हात अपवित्र झाला म्हणून तू तो कापून टाकशील का?

तू पडणार होतीस तेव्हा मीच तुला धरून सावरलं — मग तुझं अंगही बाटलं, मग तुझ्या अंगाचं काय करणार?”

 

त्याचे शब्द जणू धगधगत्या निखाऱ्यांसारखे तिच्या कानावर पडले.

ती काहीच बोलली नाही. नि:शब्दपणे वळली, आणि रात्रीच्या अंधारात कधी अदृश्य झाली ते त्यालाही समजलं नाही.

 

त्याच्या कानात मात्र अजूनही तिच्या पावलांचा मंद आवाज घुमत राहिला —

तो आवाज होता तिच्या गोंधळलेल्या मौनाचा, अपराधाच्या सावलीत हरवलेल्या भावनांचा. अन् त्याच्या जळजळीत शब्दांचा…

 

त्यांचा एकत्र प्रवास येथून फुटला.

ती तिच्या वेटाळाकडे वळली. हा त्याच्या वेटाळाच्या दिशेने चालू लागला.

 

लेखक- आर.के.जुमळे

हिरा…

 

हिरा… या कथेच्या निमीत्ताने थोडसं हितगुज…

 

ही कथा लिहिण्यामागचं प्रयोजन असं  की, माझ्या आठवणीतील ह्या  पात्राचं,  मी प्रकाशित केलेल्या 'अशा तुडविल्या काटेरी वाटा'  या पुस्तकात उल्लेख करू शकलो नाही.  कारण  माझे बालपण ते नोकरी लागेपर्यंतचा जो माझ्या जीवनातील कडू-गोड  प्रवास होता, तेवढ्या पुरतेच मला शब्दबद्ध करायचा होता. या मर्यादेत हिराचं पात्र बसत नव्हतं.

हिराच्या  अकाली मृत्यूची  घटना  म्हणजे रात्रीच्या चांदणी प्रकाशात आकाशातून  आपल्या नजरेसमोर  एखादा तारा निखळून सरकन खाली पडावा, असंच काहीसं  होतं.

म्हणून मी  विचार करीत होतो की, या पात्राची ओळख कशी करून द्यावी? याच उद्देशाने मी ही कथा रेखाटली आहे.  

या कथेतील काही प्रसंग माझ्या नोकरीच्या आधीचे आहेत, ज्याचे रेखाटन मी 'अशा तुडविल्या काटेरी वाटा' या  पुस्तकात आलेले आहे. ज्यांनी हे पुस्तक वाचलं असेल त्यांना कंटाळा येऊ नये; म्हणून मी त्या आठवणी  विस्ताराने न सांगता अगदी त्रोटकपणे सांगण्याचा प्रयत्न केला आहे.

आर.के.जुमळे

………………………………………

 

हिरा…

 

मसनखुटीत भडकलेल्या चितेच्या ज्वालात मला हिराचा अस्पष्ट असा चेहरा दिसत असल्याचा भास होत होता.

हिरा म्हणजे माझ्या मामाची मुलगी…

माझा मामा दमडू… माझ्या आईचा हा भाऊ आणि मोठी बहिण धुरपताबाई… हे तिघेही बहिणभाऊ चौधरा गावातच राहत होते. मामाचं घर माझ्या घरापासून एका हाकेच्या अंतरावर म्हणजे एक घर सोडून होतं, तर मोठ्या आईचं घर मात्र दुर होतं.

आमचे कौटुंबिक संबंध तसे जिव्हाळ्याचे होते. एकमेकांच्या घरी येणा-या पै-पाहुण्यांना आमच्या तिन्हीही घरी  पाहूणचार झाल्याशिवाय पाठवित नसत.

मामा म्हणजे गावातला मानवाईक व्यक्ती.... तो लोकांना अडीअडचणीला उसणे पैसे द्यायचा. म्हणून गावकरू त्यांना सावकार म्हणत. अशा प्रतिष्ठित  घरात 'हिरा'ने जन्म घेतला होता.

मामा शांत व अबोल स्वभावाचा. निर्व्यसनी. चिलम ओढण्याशिवाय त्याला दुसरं कोणतंही व्यसन नव्हतं. तसं चिलमीचं व्यसन खेड्यात सार्वत्रिक होतं, म्हणा.... या व्यसनाचं कुणाला काही वाटत नव्हतं.

मामा फारसा शिकलेला नव्हता. गावातील बरेचसे लोक मुळातच लिहता-वाचता येईल इतपत शिकलेले होते.

आमच्या चौधरा  गावात शाळा नव्हती. गावाजवळील निळोणा येथे शाळा होती, तिही चौथीपर्यंतच ! या कारणाने बहुतेकांचं त्यापुढील शिक्षण खुंटून जात होतं.

डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमूळे गावातील काही जागृत लोकांनी आपापल्या मुलांना जास्तीत जास्त  शिक्षण देण्याचा ध्यास धरला होता. मामा पण त्यापैकी एक होता. त्यांनी त्यांच्या मुलींना म्हणजे चित्राबाई व सुदमताबाईला यवतमाळला शिकायला ठेवले होते. माझे बाबांनी मला व माझी बहीण जनाबाई असे आम्हा दोघा बहिण-भावाला यवतमाळच्या शाळेत टाकले होते. राहायला आम्ही यवतमाळ जवळील  उमरसरा या गावाला होतो.

नंतर मामानेही त्यांच्या मुलींना उमरसरा या गावाला आणून ठेवले होते. त्यावेळी हिरापण त्यांच्यासोबत होती.

मी शिक्षणात असल्याचा मामाला मोठा अभिमान वाटत होता. मी यवतमाळला तहसील ऑफीसच्या समोर शामरावदादाची वाट पाहतांना दिसलो की, तो समजून जायचा की  मला काहीतरी अडचण असावी. मग दादा नाही आला की, तोच मला एकाद्यावेळी पैशाची मदत करायचा. एकदा मला कंपासपेटी घेण्यासाठी पाच रुपये दिले होते. मी सुट्टीत घरी गेलो की, माझी हमखास आपुलकीने विचारपूस करायचा.

 

हिरा तिच्या लग्नानंतर पहिल्या  बाळंतपणासाठी माहेरी,  मामाकडे आली होती.

तिला गरोदरपणात आजार झाला होता. हात-पाय सुजले होते. त्यातच तिचं अकाली निधन झालं. ही घटना इतकी  धक्कादायक होती की,  माझ्या मनात ती खोलवर जखम करून गेली होती.

मी तोपर्यंत कधीही कुणाच्या मयतीला स्मशानभूमीत गेलो नव्हतो. कारण तसा काही प्रसंग उद्भवला नव्हता. पण हिराच्या शवयात्रेत मात्र योगायोगाने सामील झालो होतो. आमच्या गावातील प्रेतं दशरथमामाच्या शेताच्या त्या चिरोटी शेतात ज्याला आम्ही डुंगं म्हणत होतो, तेथे नाल्याच्या काठावर खड्डा खोदून गाडीत असत. खड्डा बुजवल्यावर त्यावर मोठे दगडं टाकून  ठेवत. एखाद्यावेळी तिकडे जायची पाळी आलीच तर चोरट्या नजरेने मी या फुगलेल्या ढिगाकडे  पाहत होतो. लहानपणी ऐकलेल्या भुता-खेतांच्या गोष्टींमूळे माझ्या मनात भीतीने जबरदस्त घर केले होते. म्हणून समजायला लागेपर्यंत असे दृश्य पाहण्याची मला फार भीती वाटत होती.

आमच्या गावावरून पांढरी गावाला जातांना बाभळीच्या झाडाखाली माझी आजी नगिनाबाई म्हणजे आईची आई, जी मामाकडे राहत होती, तिला मुठमाती दिल्याची जागा एकदा दादाने मला दाखविली  होती. त्या जागेकडं लक्ष गेलं की मनात धस्स् व्हायचं.

सहसा गावातील प्रेतांना जमिनीत गाडण्याची प्रथा होती. पण  ह्यावेळी मात्र हिराच्या प्रेताला जाळण्यात आले होते.

हिराचं लग्न झालं, त्यावेळी मी ब्रम्हपुरी या दुरच्या ठिकाणी नोकरीला होतो. कार्यालयीन कामाच्या व्यस्ततेमुळे मला  सुट्टीचं न जमल्याने या लग्नाला हजर होता आलं नाही. मी तिच्या लग्नाला जरी जाऊ शकलो नाही, तरी  तिच्या मरणाला मात्र हजर झालो  होतो. ऐवढेच नव्हे तर तिच्या मरणापूर्वीच्या आजारपणात धावाधाव करण्यात माझाही मोठा वाटा होता.

हा योगायोग कसा जुळला काय माहित? पण कदाचित तिच्या अखेरच्या प्रवासात मी सोबत करावी, असे  नियतीने बहुतेक  ठरविले असावे.  म्हणूनच हा योग जुळून आला होता की काय?

त्यादिवशी हिराची तब्ब्येत फारच बिघडली होती. तिचे हात-पाय सुजले होते. तिला श्वास घेणे कठीण झाले होते. छाती खाली-वर उडत होती. म्हणून मामा, मामी व  सारेच कमालीचे घाबरून गेले होते. मी  हिराला पाहण्यासाठी मामाच्या घरी गेलो, तेव्हा मला पाहून मामा म्हणाला, 'रामराव, तू यवतमाळला जाऊन कोथळे डाॅक्टरला घेऊन ये.'

मी 'हो' म्हणून लगेच यवतमाळला जायची तयारी केली.

कोथळे डाॅक्टरांचा दवाखाना जरी लोखंडी पुलाकडे दुर होता; तरी त्यांचा बंगला आमच्या गावाच्या रस्त्यावर असल्याने आमच्या गावातील लोक त्यांच्या घरीच ते असेपर्यंत औषधोपचार घेण्यासाठी जात असत. मी त्यांना आणण्यासाठी बरबडा गावाच्या मार्गाने धावतपळत, उठत-बसत तीन कोस वाटा तुडवत  त्यांच्या घरी गेलो.

निळोणा धरण बांधल्याने पुर्वीचा जवळचा रस्ता राहीला नव्हता. म्हणून बरबडा याच गावाला वळसा देऊन यवतमाळला जावे लागत होते. दुसरा मार्ग पांढरी गावाकडून होता. पण तो दुरचा होता.

उन्हाळ्याचे दिवसं होते. दुपारची वेळ होती.  सुर्य आग ओकत होता. अंगाची लाहीलाही होत होती. शरिरातून घामाच्या धारा वाहत होत्या. घसा व ओठ राहून राहून सोकून येत होतं.

त्या रखरखत्या उन्हाच्या काहिलीने झाडांची पाने झडून गेली होती. पानझडीमूळे पायवाट ओकाबोका व उघडानागडा पडला होता.

मधातच सुटलेल्या वावटळीच्या गराडात पाय पुढे टाकणे जड जात होतं.

शेताची उन्हाळवाही सुरू होती. नांगरलेल्या शेतातून पाय उचलून चालणे अतिशय त्रासाचे झाले  होते.

डाॅक्टर नुकतेच दवाखान्यातून येवून जेवणाच्या ताटावर बसले होते.

मी त्यांना परिस्थितीची जाणीव करून गावाला चालण्याचा आग्रह धरला. हिराची तळमळ माझ्या डोळ्यासमोर तरळली की, मी कासावीस होत होतो. तिची तब्ब्येत आणखी बिघडण्यापूर्वी डाॅक्टरला घेऊन गावाला पोहोचणे फारच गरजेचं होतं. म्हणून मी त्यांची मनधरणी करीत होतो. रस्ता कच्चा असल्याने त्यांची हिंमत होत नव्हती.

शेवटी 'हो नाही' करत त्यांनी त्यांची स्कुटर आवाराच्या बाहेर काढली. मी मागे बसलो.

खरं म्हणजे त्यांच्या मागे का होईना स्कुटरवर बसायची माझी ही पहिलीच वेळ होती. स्कुटर फटफट करत चौधरा गावाच्या दिशेने निघाली. यवतमाळ आणि गोधणी गावाच्या मधात त्यावेळी जंगली झाडा-झुडपाचा उताराचा घाट होता. या घाटात मोठमोठ्या दगडाच्या उटा लागत होत्या. त्याच्याशी टक्कर घेतच स्कुटरला मार्गक्रमण करावे लागत होते. ही वाट म्हणजे कुठे बैलगाडी तर कुठे पायरस्ता तर कुठे शेतातून जाणारी होती. दगडं, माती, ढेकळांचा ओबडधोबड व त्रासदायक असा हा कच्चा  रस्ता होता. या रस्त्याने जातांना, पहिले गोधणी, मग वाघामायची टेकडी, मग बरबडा व नंतर आमचे गाव…

डाॅक्टर मोठ्या मुश्किलीने स्कुटर चालवत आणि तोल सांभाळत रस्ता कापत होते. बरबडा गावापर्यंत कसंतरी आलो. पण या गावानंतर नांगरलेल्या शेतातून जाणे म्हणजे एक दिव्यच होतं. त्या नांगरटीतून स्कुटरचे चाकं काही केल्या जागची हलत नव्हते. डाॅक्टर हँडल पकडून पुढे ओढत होते, अन् मी मागून ढकलत होतो. इंच इंच जागा पुढे सरकत होती. दोघांचीही कमालीची दमछाक झाली होती. या शेतातून बाहेर पडून बरडाजवळच्या गाडीरस्त्यावर जाईस्तोवर आम्हाला खुप वेळ लागला होता.

आम्ही मामाच्या घरी पोहचलो. डाॅक्टरला पाहून आधीच जमलेल्या गर्दीत आणखी भर पडली. आमच्या गावाच्या इतिहासात पहिल्यांदाच गावात डाॅक्टर आले होते. त्यामुळे लोकांना भरतं आलं होतं. मी डाॅक्टरला घेऊन आलो; म्हणून त्याचं श्रेय मला मिळत होतं.

डाॅक्टरने हिराची तब्ब्येत तपासली. तिची प्रकृती अत्यवस्थ झाली होती.  डाॅक्टरने  इंजेक्शन दिले आणि सांगितले की तिला यवतमाळला सरकारी दवाखान्यात ताबडतोब नेऊन भरती करा. असे म्हणून त्यांच्यासोबत एक माणूस देऊन ते पांढरीमार्गे निघून गेलेत.

त्याक्षणी हिराला दवाखान्यात नेण्याची तयारी सुरू केली. बैलगाडीत गाद्या टाकून त्यात तिला झोपवून यवतमाळच्या दिशेने गाडी निघाली. सोबत बरेच लोक पायीपायी निघाले होते. मी पण त्यात  होतो.

तिला वाघामायच्या टेकडीपर्यंत नेले नसेल तर हिराने प्राण सोडून दिला. मामाने टाहो फोडला. सारेच गलबलून गेले. मला तिचं गाडीत पहुडलेला निर्जीव देह पाहून हुंदका आवरता आला नाही. ती वाचावी म्हणून  एवढी धावपळ केली, पण सारं वाया गेलं. तिला घेऊन आम्ही माघारी फिरलो. गावात आल्यावर आम्हाला पाहून काहीतरी अघटित घडलं असावं म्हणून सारेचजण  जमा झालेत. घरी पाय ठेवल्याबरोबर मामीने हंबरडा फोडला. तरणाताठी मुलगी आपल्या डोळ्यासमोरून निघून जावी हे दु:ख सहन होण्यापलिडचं होतं. रडारड सुरू झाल्याने सारा परिसर हादरून गेला. माझ्याही डोळ्यातून आसवे टपकायला लागले.

जवळपासचे नातलग जमा झाल्यावर हिराची शवयात्रा रात्री उशिरा निघाली.  कंदिल व बॅटरीच्या उजेडात जमाव अंधाराला भेदून मसनखूटीच्या  दिशेने चालला होता.

हिराची चिता रचतांना गलबलून येत होतं.  त्या चितेवर तिला झोपवतांना दु:खाचा बांध फुटला. चितेला अग्नी दिल्यावर आगीचा भडका उडताच प्रखर उजेडाने आसमंत न्हाऊन निघाला. हिराचं शव कनाकनाने जळत होतं. शरीर नष्ट होत होतं.

अशाच प्रकारे माझा पण एक दिवस असाच शेवट होणार असा विचार मनाला चाटून गेला. ज्या शरिराला एवढ्या प्राणपणाने जपलं, ते शरीर असंच नष्ट होईल याची जाणीव चाटून गेली... जो जन्माला येतो,  तो एक दिवस असाच मरणार...! कोणी लवकर मरतो तर कोणी उशीरा मरतो, फरक  एवढाच… जीवन  हे अनित्य आहे, या भगवान बुद्धांच्या  सिद्धांताची प्रकर्षाने  आठवण झाली. मला वाटते, कोण कसा वागला याचा लेखाजोखा मसनखुटीतच होत असावा. माणसाने जगात कसं वागावं याची खरी  शिकवण मिळण्यासाठी  मसनखूटीशिवाय दुसरी जागा नसावी.

बंध मुठ्ठी आया जग में ,

खाली हाथ जायेगा।

दो दिन की जिंदगी है ,

दो दिन का मेला।

या राजस्थानी भजनाच्या ओळी येथे आठवल्याशिवाय राहत नाही.

अर्धी रात्र टळून गेली होती. वातावरणात भयान शांतता पसरली होती. वारा आणि झाडं-झुडपं सारेच स्तब्ध  होऊन श्रद्धांजली वाहत असल्याचे भासत होते.

एकटी हिराला सोडून सारेजण जड अंतकरणाने परत फिरले...

हिरा कायमची दृष्टीआड झाली...

तिच्या जाण्याने आता राहील्या होत्या फक्त  आठवणी…

परतीच्या वाटेवर आठवणीचा पुर दाटून आला...

एकेका पाऊलागणीक त्या आठवणी उफाळून वर येत होत्या...

गावात इतरांच्या मानाने मामाकडे बरीच शेती होती. त्याचं एक शेत वाघाडी नदीजवळ व बाकी गावाजवळ होती. मामाने शेती कधीच केली नाही, तर मक्त्या-बटईने लावून घातली होती. वाघाडी शेती निळोण्याचा सोनबा कोलाम तर गावातील शेती बाबा वाहत होता. बाबा ही शेती खुप वर्षापासून वाहत असावा असे आईच्या सांगण्यावरून वाटते.

ती एकदा म्हणाली होती की, 'जेव्हा मला तुया बाबाले दिले, तेव्हा त्यायची परिस्थिती गरिबीची होती. तुये बाबा आणि मोठेबाबा- पांडू दोघेही अनाथ होते. त्यायचे आई-बाबा मरगडीत मरण पावले होते. या दोघांचा सांभाळ त्यायच्या मावशीने केला. म्हणून उदरनिर्वाहाचे साधन म्हणून मामाने त्याची शेती बाबाला वाहायला दिली. मी लहान होती; तेव्हा लुळ्यासारखी राहत होती. मायं नाव अलूका असतांना मला लुली म्हणत. ह्या पोरीला कोण मागल म्हणून मामा काळजीत पडला होता. म्हणून त्याने तुया बापाला शेत वाहायला देऊन मायं लग्न लावून दिलं.' अशी ती कहाणी मला समजली होती.

मामा आधीपासूनच श्रीमंत होता. तो सावकारी करायचा. शिवाय तबला आणि चाटी बनविण्याचा धंदा करून गुजराण करायचा.

गावात आमची आर्थिक परिस्थिती ब-यापैकी होती.

आमच्या दोन्हीही कुटुंबातील संबंध सुद्धा अगदी सलोख्याचे राहीले होते.

पण कुळकायदा आल्याने आमच्या संबंधात कटुता निर्माण झाली. म्हणतात ना… 'दुधाची आई... न कसायाच्या गाई…' अशी आमची केविलवाणी अवस्था झाली होती.

'कसेल त्याची जमीन' या तत्वावर कुळकायदा आला होता. हा कायदा तसा कुळांसाठी न्यायोचीत आणि फायद्याचा होता. गावातील अनेक कुळ आता शेतीचे मालक झाले होते. पण आम्ही कुळ असूनही हा कायदा आमच्यासाठी जाचक ठरला. या कायद्यामुळे मामा चलबिचल झाला. त्याला वाटले की, 'शेती आता कोंडूची होईल.' म्हणून त्याने शेती परत देण्यासाठी तकादा लावला.

खरं म्हणजे जवळच्या नातेसंबंधामुळे बाबाने मामाची शेती कुळ कायद्यान्वये आपल्या मालकीची करून घेणे कधी मनातही आणलं नसतं.

बाबाचे म्हणणे असे होते की, 'तुमच्या शेतीची मालकी तुमच्याचकडेच राहू द्या. पण मला तुमची शेती आतापर्यंत जशी वाहत आलो, तशी वाहू द्या. कारण माझ्याकडे उत्पनाचे दुसरे कोणतेही साधन नसल्याने माझी मुलं-बाळं उघड्यावर पडतील.'

आईला या वादात काही बोलता येत नव्हतं. कारण 'इकडे घरचा माणूस व तिकडे भाऊ...'  

'इकडे आड, तिकडे विहीर' अशी तिची अवघड परिस्थिती झाली होती. तरीही मामी आणि आईच्या मधात भांडण जुंपत राहायचं. दोघ्या नंदा-भावजयीचं कडाक्याचं भांडण मामा मुकाट्याने पाहत राहायचा.

त्याला बहीण-भाच्यांबद्दल माया, कळवळा नसेल असे कसं म्हणता येईल? पण मामीसमोर त्याचं काही चालत नव्हतं.

शेवटी तणाव खुपच वाढत चालल्याने बाबाने शेती परत केली. त्याबदल्यात मामाने शेंबडीचं चार एकर शेत नाममात्र किंमतीत बाबाच्या नावाने करून दिली. कुळकायद्यात कुळांना उचीत मोबदला देऊन शेती सोडवून घ्यायची मुभा होती. याच पद्धतीने मामाने आमच्याकडून व सोनबा कोलामाकडून शेत्या सोडवून घेतल्या होत्या.

पण ही शेती भरकाड असल्याने फारशी पिकत नव्हती.

आमची परिस्थिती आता कमालीची डबघाईला आली होती. पुर्वीचं वैभव आता ओसरत चाललं होतं. आमच्या शिक्षणाची आबाळ होत होती.

मामाला शेती परत केल्याने बरेच दिवस आम्हाला काहीतरी हरवल्यासारखे वाटत होतं. पांदणीच्या रस्त्याने जाता-येतांना वाडीकडे लक्ष गेलं की, उरात उमाळा दाटून यायचा. ह्या शेताबद्दल कमालीचा जिव्हाळा निर्माण झाला होता. हे शल्य आमच्या घरात खुप दिवस बोचत राहीलं. आता या गोष्टीला काही काळ लोटला होता, म्हणा… पण जखमा मात्र अजूनही पुर्णपणे बुजल्या नव्हत्या.

मला विद्युत मंडळाच्या चंद्रपूर विभागात नोकरीचा आदेश आला होता. नोकरी तर लागली; पण जायला व तेथे राहायला घरी कोणाकडेही तेवढे पैसे नव्हते. कोणाकडून मिळेल का याची चाचपणी करून पाहीली. पण कुणीही आधार दिला नाही. पैशाअभावी तोंडाजवळ आलेला घास हिरावून जातो की काय या विवंचनेत मी गटांगळ्या खात होतो.

मला शाळेत एक कविता होती.

'तदितर खग भेणे वेगळाले पळाले…….

कठिण समय येता कोण कामास येतो।'

या कवितेची नेमकी आठवण झाली.

मी खुप विचारात गढलो असतांना एकाएकी तुळशीरामदादा- माझ्या मोठ्या आईचा मुलगा, याचं नाव आठवलं. तो एक आशेचा किरण दिसला. म्हणून मी त्याला विचारलं. त्यानं कोणतेही आढेवेढे न घेता सोन्याची  अंगठी गहाण ठेवून चाळीस रुपये आणून दिले. माझ्या डोक्यावरचं ओझं उतरलं. त्याचे हे उपकार मी कधीही विसरलो नाही.

त्याकाळात समाजात शिक्षणाचं प्रमाण तोळा-मासाएवढं... त्यातही गळती… काॅलेजपर्यंत पोहचणा-यांचं प्रमाण अगदी अल्प… नोकरी मिळविण्यासाठी मरणाची ओढाताण… म्हणजेच नोकरीवर लागलेले मुलं अगदी बोटावर मोजण्याइतपत दिसत होते.

मला नोकरी लागल्याने माझी किंमत वाढली होती. गावात सर्वांनाच मोठं कौतुक वाटत होतं. त्यावेळी वाघाडी नदीवर धरणाचं काम जोरात सुरू होतं. बाबा भजे बनवून या धरणावर विकायला नेत होता. त्यामुळे माझ्या नोकरीची बातमी तेथेही वा-यासारखी पसरली होती. मी त्याच्यासोबत तेथे गेलो; तेव्हा 'हाच काय भजेवाल्याचा पोरगा' म्हणून माझ्याकडे कुतूहलाने पाहत होते.

'पोरगा शिकला, नोकरी लागली, मोठं बिन्नीचं काम केलं ...'

'गावाचं नाव कमावलं…' असे बोलून माझी वाहवा करीत.

'नोकरी म्हणजे बिनपाण्याची शेती, बारमाही पिकते... असे लोक बोलून दाखवत.

'पाणी नाही आला तरी नोकरी बुडत नाही. पण आमची शेती मात्र बुडते !'

'कितीही दुष्काळ पडला तरी पगार काही थांबत नाही…!' 'आता काय, रामराव… तुही काया पालटली, बावा...' असे म्हणून गौरवाने माझ्या पाठीवर थाप मारत.

खरंच, मला पण खुप आनंद झाला होता.

आई, बाबा, शामरावदादा, माझी वहिनी अनुसयाबाई व बहिण जनाबाई यांनी माझ्या शिक्षणासाठी उपसलेल्या कष्टांचं चिज झालं होतं.

लग्नाला आलेली मुलगी आई-बापाला ओझंच वाटते. ती सुखात पडावी असं प्रत्येक आई-बापाला वाटणे साहजिकच असते. नोकरीवाला नवरा मिळावा, ही मुलीची पण सहज इच्छा असते. म्हणून आई-बाप तसा प्रयत्न करतात, त्यात वावगं काहीही नसतं.

पण मी अद्याप लग्नाच्या बाजारात उतरलो नसतांना सुद्धा माझ्या लग्नाची एकतर्फी चर्चा गावात सुरू झाल्या होत्या, ही गोष्ट मला जरा विचीत्रच वाटली होती.

'रामराव माह्या पोरीला मागल तर मी इतका हुंडा देईन' अशी अहमहमीका मामा व गावातील चिरकुटा जो माझ्या गावनात्यात मामा लागत होता, यांच्यात सुरू झाल्याचे माझ्या कानावर आले होते.

श्रीमंत पोरींचे बाप कफल्लक पण आता नोकरीवर लागलेल्या पोरांच्या मागे हुंडा घेवून कसे फिरतात, त्याचं हे जिवंत उदाहरण म्हणता येईल. हुंड्याची ही कीड समाजात पसरत चालली होती. श्रीमंत बाप नोकरीवाल्या पोरांना विकत घेऊन पोरी खपवण्याचा प्रयत्न करीत होते. पोरगा पाहायला कसाही असो, त्याची घरची परिस्थिती कितीही फाटकी असो, पण तो नोकरीवर आहे ना ! मग त्याला पोरगी द्यायला हरकत नाही. अशी भावना पोरीच्या आई-बापाची असायची.

तोच खेळ माझ्याही बाबतीत सुरू झाला होता. मला नोकरी लागली म्हणून हुंड्याच्या गोष्टी करून पैशाचे आमिष दाखवीणे, याची मला खुप चिड आली होती.

हिरा अगदी निरागस आणि सोज्वळ स्वभावाची  होती. मी जसा लाजाळू होतो, तशीच ती पण काहीशी होती. त्यामुळे आमच्यात फारसं मोकळेपणाने संभाषण होत नव्हतं.

माझी पुतनी संघमित्रा… हिच्या बरोबरीच्या मैत्रिणी माझ्या घराच्या अंगणात खेळायला अथवा नट्टा-पट्टा करायला जमत. त्यात हिरा पण असायची. माझ्या घराचं अंगण मोठं होतं. भोवताल भिंतीचं आवार असल्याने मुलींना सुरक्षित वाटायचं.

गावात कासार, मनेरीवाला आलेत की, ते आमच्या अंगणात बस्तान मांडत. मग आजुबाजुच्या बाया-मुली बांगड्या भरायला अथवा मनी डोरले घ्यायला या अंगणातच जमा होत.

मामेबहिण या नात्याने माझे लंगोटी मित्र माझी थट्टा करीत; तेव्हा मी लाजत होतो. माझी जशी थट्टा करीत होते, तशीच थट्टा  हिराच्या  मैत्रीणी सुद्धा करीत नसतील, कशावरून? या काल्पनिक भावनेत माझं मन उगीचच गुंतून जात होतं. ते वयच होतं तसं ! पण एक खरं की, आमच्यात कोणत्याही प्रकारच्या प्रेमाच्या भावना दडलेल्या नव्हत्या. पण हिराचं मन मला थोडंच वाचता येत होतं?

पुर्वी भावाला मुलगी झाली की, बहिण भाचीच्या बेंबीला कुंकू लावून सोयरसंबंध जुळवून ठेवत असत, म्हणे… पण आजच्या काळात तसं काही राहीलं नव्हतं. पण मुलं लग्नायोग्य झाल्यावर मात्र तसे सोयरसंबंध जुळवाजुळव करायला जवळचे नातलग कामाला लागत, हे मात्र खरं होतं.

मामा-मामी घरात माझ्या संबंधाच्या गोष्टी करीत असतांना हिराला पण माहीत पडले असेलच. कारण अशा गोष्टी काही लपून राहत नाहीत. माझ्याही घरात माझे आई-बाबा जनाबाईच्या लग्नाच्या गोष्टी करत; तेव्हा आम्हाला माहिती पडतच होतं.

यामुळे हिराही आपल्या मनातल्या मनात माझ्याबाबतीत आशा बाळगून असली तर चुकीचं काय होतं ?

मामाने शामरावदादाकडे माझ्या लग्नासाठी विचारून पाहीले होते. हिराला मागत असाल तर मी  हुंडा देतो, असं म्हणाला होता. दादाने, 'तुच रामराव घरी आला की, विचारून पहा ना...' असे बजावले होते.

ही गोष्ट दादाने मला सांगितली होती. शिवाय मी गावाला आलो, तेव्हा फकीरादाजींनी हा विषय छेडला होता. फकीरादाजी म्हणजे माझ्या मोठ्या आईचा जावई... गावातला बोलका माणूस… लग्न व्यवहार जुळविण्यात तो वाकबगार होता. म्हणून लोक अशा गोष्टी त्यांना सांगून लग्नाची जुळवाजुळव करीत असत.

दाजी मला म्हणाला,

'रामराव तु हिराला मागत असशील तर तुवा मामा तुला हुंडा द्यायला तयार आहे.'

'दाजी, हुंड्यासाठी मी भुकेला नाही. खरं म्हणजे हुंडा पद्धत मला मुळीच आवडत नाही. दुसरं असं की, मी आताच लग्न करणार नाही. नोकरी लागून मला जेमतेम एक वर्ष झालं असेल. मला आणखी काही वर्षे नोकरी करून आमची खालावलेली परिस्थिती सुधरायची आहे. त्यानंतरच मी लग्नाचा विचार करीन. म्हणून माझ्या भरोशावर  राहू नका, असे निर्वाणीचे मामाला सांगून टाक.'

खरं म्हणजे हिरा जेव्हाकेव्हा माझ्या घरी यायची तेव्हा घरात शिरतांना 'आत्या, आत्या' करीतच यायची. माझ्या आईवर तिचा मोठा जीव होता. आईच्याही ती लाडाची होती. या दोघी आत्या-भाचीचं मस्त पटायचं. पण माझ्या मामीचा स्वभाव आडवा येत होता, ना...

मामी म्हणजे मागचा पुढचा विचार न करता टचकन बोलून टाकणे या स्वभावाची… ज्याला फटकळ स्वभाव म्हणतात… त्यामुळेच आम्ही तिच्यापासुन दोन हात दुरच राहत होतो.

म्हणून आमच्या घरात कोणी 'होय' म्हणत नव्हते की 'नाही' म्हणत होते ! अशी तटस्थपणाची भुमिका सर्वांनी अंगीकारली होती.

आमच्या नात्यातील धागे जर घट्ट विणल्या गेले असते तर कदाचित चित्र  वेगळही उमटले असते. पण नियतीला ते मान्य नव्हतं असेही म्हणावे लागेल. सारं काही परिस्थितीवर अवलंबून असतं, असं जे म्हणतात ते खरंच आहे.

काही दिवसांनी हिराचं लग्न जुळलं. नोकरीवालाच जावई मिळाला, ही समाधानाची बाब होती. पण पहिल्या बाळंतपणात तिचं असं दुर्दैवी निधन व्हावं, ही घटना अकल्पित आणि अतिशय दु:खदायी होतं.

त्यादिवशी मी माझ्या घराच्या अंगणातील ओट्यावर बसलो होतो. मामी आवाराच्या दरवाज्यातून आतमध्ये येतांना दिसली. तिचा चेहरा रडवेला दिसत होता.

मला पाहून हुंदके देत माझ्याजवळ आली.

माझा गळा पकडून,

'रामराव, तुम्ही माह्या पोरीले मागीतले असते तर माही हिरा मेली नसती गा…'

असे म्हणून हमसून हमसून रडायला लागली.

मला पण गहिवरून आलं.

वातावरण अत्यंत धिरगंभीर झालं.

मामी थोडी शांत झाल्यावर मला पुन्हा म्हणाली,

'रामराव, माही हिरा तुमच्या घरात सुखात राहीली असती गा...!'

'माझं मन म्हणते, ती अशी मेलीच नसती…'

मी एकदम अवघडलो.

थोडावेळ थांबून आणखी म्हणाली,

'काय करावं…?' एक उसासा टाकला.

'तिचं नशिबच तसं असेल ! त्याला तुम्ही काय करणार...?'

माझ्या तोंडातून शब्दही फुटत नव्हतं.

मामीची समजूत कशी काढावी तेच कळत नव्हतं.

पण मामीचं हे बोलणं ऐकून मी अंतर्मुख झालो.

अपराधी भावनेनं मी अस्वस्थ झालो.

 

लेखक- आर.के.जुमळे

दि.१०.५.२०२०