ही सत्य घटना आहे. ती मी कथेच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
त्यावेळी मी वणी जि.यवतमाळ येथे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या उपविभागीय कार्यालयात सहाय्यक लेखापाल या पदावर नोकरीला होतो.
मी सकाळी कार्यालयात येतांना एसटी स्टँडच्या बाहेर गेटजवळील मैदानावर काही भटक्या जमातीचे पाल पाहत होतो. आज मात्र तेथे गर्दी दिसल्याने थबकलो. मी ते दृश्य पाहून सुन्न झालो. माझं संवेदनशील मन कमालीचं चरफडलं, हळहळलं… म्हणून मी त्या दृश्याला आकार देऊन कथा गुंफण्याचा प्रयत्न केला. ही घटना १९८८ या वर्षातील आहे. तरी त्या काळाचा संदर्भ लक्षात घेऊन ही कथा वाचावी.
⏺⏺⏺
बरं, ही कथा लिहण्यास मी का प्रेरीत झालो? त्याची पार्श्वभूमी पण सांगतो-
ही घटना पाहून मला का कॉलेजच्या होस्टेलची नेमकी आठवण झाली. या पोराने पोटाची खळगी भरण्यासाठी भाताच्या गंजाची चोरी केली होती, तशीच चोरी आम्ही होस्टेलचे मुलं पण सर्रासपणे करीत होतो. आम्ही जेवायला मेसमध्ये जात होतो. तेथे जेवता जेवता कुणाचं लक्ष नाही असं पाहून चुपचापपणे पैजामा/पँटच्या खिशात पोळ्या किंवा हायब्रीडच्या भाकरी कोंबत होतो. मेसमधून बाहेर पडलं की, खिसे फुगलेले दिसायचे. त्याला लपवत लपवत खोलीवर येत होतो.
आमच्या होस्टेलमधील काही मुले अर्थाजनासाठी कापसाच्या जिनात काम करीत असत. आम्हाला स्कालरशिप जी मिळायची तिचा आमच्या खर्चासाठी काहीही उपयोग होत नव्हता. ही स्काॅलरशिप दिवाळीची सुट्टी लागत होती तेव्हा व वार्षिक परिक्षा झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत घरी जातांना अशी दोनदा मिळायची. काॅलेजची फी व होस्टेलच्या राहण्याची व जेवण्याचा खर्च कापून थोडेफार पैसे शिल्लक राहत ते घरी खर्च होत होते.
माझ्यासारखेच बहुतेक मुले गरीबीत शिक्षण घेत होते. कपडे, पुस्तके, वह्या, तेल, साबना इत्यादी खर्चासाठी पैशाची गरज पडायची, ती बाहेरची कामे करून भागवित होतो.
मी कापसाच्या जिनात रात्रपाळीमध्ये काम करत होतो. माझा लहान भाऊ शाळेत शिकत होता. (आज तो एमबीबीएस, एमएस डाॅक्टर झाला आहे.) त्याला होस्टेलमधे टाकले होते. पण तेथे त्याची खाण्यापिण्याची व राहण्याची फारच गैरसोय होत होती. म्हणून त्याला माझ्याजवळ ठेवले होते. संध्याकाळचा माझा डब्बा कोणीतरी मुलगा आणून देऊन तो अर्धा खाऊन अर्धा माझ्यासाठी घेऊन येत होता. हा जीन शहराच्या दुस-या टोकावर असल्याने खुपच लांब होतं. तितक्या दूर त्याला रात्रीच्या वेळी येण्या-जाण्यासाठी खुप त्रास होत होता. हे मला पाहवल्या जात नव्हतं. म्हणून मी ते बंद करून मीच सकाळी चोरून आणलेल्या पोळ्या/भाकरी दुपारी जीनात येतांना घेऊन येत होतो. जेवणाच्या सुट्टीत भजे विकत घेऊन त्याच्यासोबत खात होतो. असाच प्रकार सर्वच मुले करीत असत. जर ही चोरी उघडकीस आली असती व मॅनेजरने जर पोलिसात रिपोर्ट दिला असता तर आमचीही अवस्था या कथेतील पोरासारखी झाली असती. या कल्पनेने हे दृश्य पाहतांना मला दरदरून घाम फुटला होता. अंगावर शहारे उमटले होते. म्हणून ही कथा सहजपणे माझ्या लेखणीत उतरली.
⏺⏺⏺
*भाताची चोरी*
तो तारुण्याने मुसमुसलेला, कसदार शरीराचा, ओठावर मर्दानकीचे प्रतिक असलेला, त्याच्या उघड्या शरीरावरचा एकेक स्नायू तणावग्रस्त वाटावा असा हा स्वतंत्र भारतातील जवामर्द जवान, परंतु चोर ठरलेला...! दोरीने करकचून पाठीमागे बांधलेले दोन्हीही बलदंड हात तो सोडविण्याचा असफल प्रयत्न करीत होता. बारीकशा वेळूच्या माराने सर्वांगावर उमटलेल्या अन् धुळीने माखलेल्या रक्तीम रेखा जणूकाही त्याच्या जीवनाचा आलेख असावा याची साक्ष देत होत्या.
खरेच, कोणता गुन्हा केला होता त्याने की ज्यामुळे त्याला अशा मरण यातना भोगाव्या लागत होत्या? मी पाहिलं, तेव्हा माझं डोकं चक्रावूनच गेलं... त्याने चोरी केली होती... काय असं चोरलं होतं, त्यानं...?? सोने, नाणे असे काहीही चोरल्याचं दिसत नव्हतं. हो… पण त्याने शिजलेल्या भाताचा गंज मात्र चोरला होता आणि हेच काय ते महापातक त्याच्या हातून घडलं होतं... सोने, नाणे यापेक्षाही भात त्याला खुपच मौल्यवान वाटलं होतं.
भांडवलदाराचे, सत्ताधीशांचे पगारदार नोकर इमानेइतबारे त्या भारतीय तरुणाच्या चोरी प्रकरणाची शहानिशा करीत होते. जेथून गंज चोरला तेथे त्याला आणल्या गेले. हाताला काम नसलेली बरीच रिकामटेकडी माणसे सभोवताल जमा झाली होती. बेरोजगारांना काही तोटा नाही, याचं ते द्योतक होतं.
तो तंटयाभिल्लासारखा बिनधास्त सर्वांकडे नजर फिरवीत पाहत होता. त्याला रोजगार असता तर कशाला तो असा पोलिसांच्या कचाट्यात सापडला असता?
जीप घेऊन आलेले पोलीस मर्दुमकी गाजवू लागले. बाया-बापूड्यांनी डोळे विस्फारले. एक जबरदस्त पोलिसाचा घुटना त्याच्या पोटात बसला. तसा तो विव्हळला. ‘सांग हरामखोरा.’ असे म्हणून दुसऱ्या पोलिसाने त्याचे डोक्याचे लांब केसं ताकदीने ओढले. तो तोंडातून चित्कार फेकण्याशिवाय दुसरं काही करू शकत नव्हता. एका महाशूर पोलिसाने त्याचे डोके जीपच्या लोखंडी पत्र्यावर जोरात आपटले. हृदय पिळवटणारा त्याचा तो आर्त आक्रोश आसमंतात घुमला. निर्दयी क्रूर लांडग्यांनी असहाय बकरीच्या पिलाचे लचके तोडावे, असेच ते दृश्य भासत होते.
भारतीय नागरिकांशी रक्ताचे नाते असलेला मी एक पामर थरारून गेलो होतो. ही मोगलाई की पेशवाई ह्याची तुलना करू लागलो. जीपजवळ जावून आतमध्ये डोकावलो. तेथे ठेवलेल्या भाताचा गंज त्याच्या चोरीची साक्ष देत होता. शूरवीर पोलीसांचा चामडी पट्टा त्याचे रक्त पिऊन सुस्तावला होता. त्याच्या पाठीचा खरपूस समाचार घेऊन तडकलेली काठी तेथे आराम करीत होती.
किती मारठोक? तरी म्हणे, ‘त्याला काहीच होत नाही. पळतो, हुलकावणी देतो. अहो, काट्याकूट्यात लपतो. तरी काहीच होत नाही त्याला! आम्ही काट्याच्या झुडपातूनच त्याला बाहेर काढून आणले आहे. आमची पुरती दमछाक केली त्याने.’ असे छातीत हवा भरून एक पोलिस सांगत होता.
मला प्रश्न पडला. ‘काय हा तरुण माणूसच आहे ना? त्याला काय मन नाही? संवेदना नाहीत? स्वाभिमान, आत्मसन्मान काही, काही नाही त्याला??
चोरलेल्या अन्नाची धड चव त्याला घेता आली नाही आणि आता तो मार खावून खावून तुटल्यासारखा झाला होता. सर्वांगाच्या सा-या कळा त्याच्या चेहर्यावर उमटल्या होत्या. त्याचा चेहरा निस्तेज होवून सुध्दा त्याच्या डोळ्यात दयेची भिक दिसत नव्हती. याचनेचा भाव तर नव्हताच. मरीमाय पुढे कापण्यास आणलेल्या बकरीसारखा तो निश्चल उभा होता. विस्कळीत मन घेऊन क्षणाक्षणाला भेदरल्या सारखा तो पाहत होता. पोलिस त्याच्यावर रोखून पाहायला लागला की, तो लगेच टवकारत होता. प्रतिकार करण्याची वृथा उर्मी त्याला स्वस्थ बसू देत नव्हती.
माझे मन उदगारले, ‘शंबूका, रामापुढे तुझे काही चालेल का?’ स्वर्गप्राप्तीसाठी शंबूकाने तपस्येची चोरी केली होती आणि याने भुकेसाठी अन्नाची! मी स्वतःलाच म्हटले, ‘रामायण अद्याप संपले तरी कुठे? ते तर सुरूच आहे...’
त्याला मुडद्यासारखे जीपमध्ये टाकून सरकारी सेना निघून गेली होती. माझ्या ह्रदयाच्या स्पंदनाची गती काही केल्या कमी होत नव्हती. माझ्या नजरेसमोर बंदी शाळेतले खास ‘टॉर्चर रूम’ घुमले. अंधाऱ्या कस्टडीत त्याला बंद केले आहे. त्याच्या आर्त किंकाळ्या भिंतीला टक्कर देऊन परत त्याच्याच कानावर आदळत आहेत ! त्याचेच कान अन् त्याच्याच किंकाळ्या! त्याचे कानही कदाचित कंटाळले असतील, त्याच्या किंकाळ्या ऐकून! त्याचे मन आणि चामडी बधिर झाले असतील, मार खाऊन खाऊन…!!!
मित्रहो, तो म्हणे, नेहमीच जेलमध्ये असतो. कालच तो तेथून सुटून आला. आता परत त्याने जेलमध्ये जायची तयारी केली. बाहेर उपासी व उघड्यावर राहण्यापेक्षा त्याला जेलमध्ये खायला व राहायला मिळते. तो या प्रस्थापित वर्गाला जाहीररीत्या चौकाचौकात ओरडून का नाही सांगत की, हे सत्तासांडानो, तुम्ही माझ्या रिकाम्या हाताला काम का नाही देत? ह्या देशाचा सन्माननीय नागरिक म्हणून का नाही जगू देत?
नाही... त्याच्या जीवनाची चाकोरीच वेगळी... जेलयात्रा, हेच त्याच्या जीवनाचं ध्येय ! सक्त मजुरीची शिक्षा मिळाली की तेथे काम मिळते ना... पोटाची खळगी भरण्यासाठी डुकरांनीही नाकारावे असे खाद्यान्न मिळते ना... स्वातंत्र्यांची चिंता नाही की गुलामगिरीची चीड नाही! भारतीय संस्कृतीने लादलेला हाच त्याचा धर्म व धंदा ! चोरी करावी, पोलिसांची परीक्षा पास करावी व दयावंत न्यायाधीशाच्या कृपाप्रसादाने बिनभाड्याच्या प्रसादात प्रवेश करावा, हाच त्याच्या आयुष्याचा जन्मजात कार्यक्रम... अर्थात मृत्यूचा आदेश येईपर्यंत !
मित्रहो, या देशात काय कमी चोर आहेत? प्रतिष्ठित, मान्यताप्राप्त व परवानाधारक स्मगलर्स आहेत. बाहेर देशात स्विसबँकेद्वारे पैसा नेणारे आहेत. नफेखोरी, साठेबाजी, काळाबाजार करणारे व्यापारी-दलाल आहेत. श्रमिकांचे रक्तशोषक उद्धोगपतीही आहेत. भ्रष्टाचारी कामगार-अधिकारी व पुढारी आहेत. कामचुकार करणारे कर्मचारी-अधिकारीही आहेत. दलितांना पायदळी तुडवीणारे, त्यांच्यावर अमानवी अत्याचार करणारे तथाकथित सनातनी, उच्चवर्णीय आहेत. स्त्रियांची अब्रू लुटणारे, हुंड्यासाठी त्यांना जिवंत जाळणारे धर्माधिकारीही आहेत. मात्र त्यांची अशी धिंड काढली जाते का?
शिजलेल्या भाताचा गंज चोरल्यामुळे जशी पोलिसांची काठी रंघ्रारंघ्रात आग पेरते, तशी अवस्था ह्या हरामखोरांची होत असते का? ह्याच्या कितीपट शिक्षा त्यांना होते? नाही होत ! इतकेच नव्हे तर न्यायाचा आव आणून गोरगरिबाला सर्रासपणे ठोकणारे हे ठोकशाहीवादी सरकारी गुलाम भ्रष्टाचारापासून किती दूर आहेत? काय भ्रष्टाचार करणे म्हणजे चोरी नाही काय?
स्वातंत्र्याच्या ४१ वर्षानंतरही या देशात अन्नासाठी चोरी करावी लागते… ही किती मोठी शोकांतिका आहे. बाळंतपणाची व्यवस्था व्हावी म्हणून चोरीच्या माध्यमातून जेलमध्ये जाण्याचे डोहाळे लागतात आमच्या गरीब स्त्रीला ! तारुण्यात प्रेयशीची वाट पहावी, तशी नोकरी लागण्याची वाट पहावी लागते आमच्या भारतीय युवकाला ! आणि शेवटी निराश होऊन आत्महत्येचा मार्ग पत्करतो ! केवढी ही स्वतंत्र भारतीयांची दुर्दशा ! ४१ वर्षात हेच काय ते सत्ताधाऱ्यांच्या कर्तृत्वाचे विषमय फलित...???
भुके कंगाल कोण आहेत? बेकार-भटकणारे कोण आहेत? अन्याय-अत्याचार कुणावर होतो? गेल्या ४१ वर्षात दुःख आणि दारिद्र्यात कोण भरडल्या जातोय? गुलामी आणि लाचारीत कोण जगतोय? अर्थात ८५ टक्के बहुजन समाजच ना…
तो चोर बहुजन समाजाच घटक होता, यात तिळमात्र शंका नाही. कारण उच्चवर्णीयांवर अशी पाळी कधीच येत नाही. बहुजन समाज गरिबच राहावा व त्याने गुन्हेच करीत राहावे म्हणून हेतूपुरस्सर षडयंत्र रचल्या गेले आहेत. त्याला गुन्हेगारीच्या चक्रात अडकवून ठेवल्या जात आहे. शेटजी-भटजी-लाटजी सुखात लोळत आहेत. करोडोच्या संपत्तीत लोळणारी ही जल्लाद माणसे गरिबांच्या तोंडातला घासही हिसकावून घेतात. आणि तरीही त्यांचे सत्कार घडवून आणले जातात. पैसा व सत्ता त्यांची पाठराखण करतात. ते न्याय विकत घेतात, नव्हे तेच न्याय देतात आणि बहुजन समाजाचे शोषण करण्यास स्वैर व स्वतंत्र असतात. हिच या देशाची खरी वास्तवता आहे.
माझ्या नजरेसमोर तो मघाचा तरूण पुन्हा उभा राहिला. खरेच त्याला आत्मसन्मान नाही का? त्याला अर्ध नग्न करून, त्याचे हात बांधून, मारहाण करून गावात फिरविल्या जाते, केवढी ही गरिबांची विटंबना!
माझ्या भोवतालची गर्दी अजूनही कमी झाली नव्हती. मला ओरडावेसे वाटले, 'हे बहुजन बांधवांनो, अरे ही तुमचीच धिंड आहे. आज तुम्ही सुपात आहात, उद्या जात्यात जाल ! तुम्हाला मिळणार्या ह्या अमानूष वागणुकीचे हे भोग संपविणे तुमच्याच हातात आहे.'
बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, 'हक्क केवळ लढून आणि लढूनच मिळतात.'
तेव्हा बहुजन बांधवा, 'अत्त दिप भव' हा मंत्र उराशी बाळगून, तू मुठभर सैतानाच्या मगरमीठीतून शिकून संघटीतरीत्या संघर्ष करून व शासनकर्ती जमात बणून मुक्त हो ! मुक्त हो !! मुक्त हो !!!
आर.के.जुमळे
वणी जि.यवतमाळ
दि. १८.२.१९८८
No comments:
Post a Comment